Akola Lok Sabha : अकोल्यासाठी ठाकरे-आंबेडकरांनी जुळवलेले गणित; पवारांच्या गुगलीमुळे फिस्कटले?

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar News : वऱ्हाडातील तिन्ही जागा महाविकास आघाडीला काबीज करायच्या असतील तर पदवीधरचे गणित जुळवावे लागेल.
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash AmbedkarSarkarnama

Akola LokSabha Constituency News : पश्‍चिम विदर्भातील अकोल्यामध्ये विद्यमान खासदार भाजपचे संजय धोत्रे आहेत. बुलढाण्यात प्रतापराव जाधव खासदार आहेत. पूर्वी ते शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) होते. आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. भविष्यात भाजपचीही (BJP) वाट ते धरू शकतात आणि वाशीममध्ये शिवसेना शिंदे गटाच्याच भावना गवळी खासदार आहेत. म्हणजे सध्या शिंदे-भाजप युतीचे तिन्ही खासदार वऱ्हाडात आहेत. या तिन्ही जागा महाविकास आघाडीला काबीज करायच्या असतील तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांप्रमाणे त्यांना एकत्र राहावे लागेल.

विधानपरिषद निवडणूक आणि पोटनिवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीने वज्रमूठ घट्ट ठेवल्यासच भाजपला दूर ठेवता येणार आहे. अन्यथा या तिन्ही लोकसभा मतदारसंघांतून भाजपला हद्दपार करणे अवघड आहे. अकोल्याची जागा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला देऊन तेथे वंचित बहुजन विकास आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना लढवल्यासच हा विजय मिळू शकतो. हे गणित मांडण्यात आले होते. तशी सकारात्मक चर्चाही सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दोघांचीही मोठी कोंडी झाली आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

महाविकास आघाडीत वंचितला घेण्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) आज म्हणाले, ''आत्ता महाराष्ट्रात जी तीन पक्षांची आघाडी आहे. त्यामध्ये आणखी कोणी चौथा असेल असे दिसत नाही. कुणालाही अॅडजेस्टमेंट करावी लागत असेल तर त्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन करावे लागेल. स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन त्या-त्या ठिकाणी कार्य करावे लागेल, असे म्हणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा महाविकासमध्ये येण्याचा रस्ताच बंद करून टाकला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि ॲड. आंबेडकर यांनी अकोल्यासाठी मांडलेले गणित फिसकटल्याची चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर उमेदवार नसल्यास ही लढत भाजपसाठी सोपी होईल, अशीच आजची स्थिती आहे. कारण प्रकाश आंबेडकर स्वतंत्र निवडणूक लढल्यास वंचितची मते आघाडीला मिळणार नाहीत. हीच बाब नेमकी भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.

कॉंग्रेसने (Congress) कितीही तगडा उमेदवार दिला तरीही विजयाची शक्यता कमीच दिसते. कारण ते अकोल्याच्या जातीय समीकरणात बसत नाही. मते विभाजित होण्याचा मोठा धोका आघाडीसमोर आहे. भाजपचे खासदार कमी करायचे असतील, तर महाविकासला वज्रमुठीत आंबेडकरांना घेणे गरजेचे आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Bhandara-Gondia LokSabha : परंपरा सुरु राहणार की इतिहास घडणार; भाजपमध्ये अनेक इच्छुक : पटोलेंची भूमिका महत्त्वाची

तब्बल चार वेळा खासदार राहिलेले भाजपचे संजय धोत्रे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक लढणार नाहीत, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना २०२४ मध्ये लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर त्यांनी नकार दिला, तर धोत्रेंचे जवळचे नातेवाईक डॉ. रणजीत सपकाळ यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. सपकाळ सद्यःस्थितीत महाबीजचे संचालक आहेत. पूर्वी धोत्रे महाबिजचे संचालक होते. ते खासदार झाल्यानंतर तेथे डॉ. सपकाळ यांना बसवण्यात आले. रणधीर सावरकर लोकसभा लढल्यास संजय धोत्रेंचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून उतरवण्याची दाट शक्यता आहे.

पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार अकोला लोकसभा कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. येथे कॉंग्रेसने सोयीचे राजकारण करून मुस्लीम उमेदवार नेहमी दिला आहे. मात्र, आता भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढावे लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही. पण वंचित बहुजन आघाडीला दूर ठेऊन आघाडी ही जागा कशी जिंकणार, याचे गणित सध्यातरी लागत नाहीये. कारण वंचितची दोन ते अडीच लाख मते महाविकास आघाडीलाच मागे खेचणार आहे, हे नक्की.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Prakash Ambedkar
Ramtek Lok Sabha : तुमानेंची वाट खडतर; आघाडीची ताकद अन् मतदारसंघाचा इतिहासही ठाकरेंच्या पथ्यावर पडणार...?

२०१९च्या निवडणुकीत संजय धोत्रेंना ५ लाख ३३ हजार मते मिळाली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला होता. त्यापूर्वीच्या निवडणुकीत ४ लाख ५६ हजार ४७२ मते घेतली होती. २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी २ लाख ५९ हजार ७८७ लाख मते, तर कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांनी २ लाख ३१ हजार १७५ मते मिळवली होती. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ५० हजारांच्या वर परंपरागत मते आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी एकीने लढल्यास राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि वंचितची जवळपास अडीच-अडीच लाख मते आणि शिवसेनेची ५० हजार मते, असे गणीत ठाकरे-आंबेडकरांनी जुळवले होते. मात्र, शरद पवारांच्या आजच्या वक्तव्याने ते फिसकटवले आहे.

२०२४ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार देशभरातली राजकीय पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातील लोकसभेची एक-एक जागा महत्वाची आहे. वंचितला सोबत घेतल्यास वऱ्हाड पट्ट्यासह विदर्भभर आणि उर्वरित महाराष्ट्रातही फायदा होऊ शकतो. पण त्यांनी वंचितला सोबत घेण्याचे नाकारले आहे. त्यामुळे त्यांची रणनीती काय, याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. असे म्हणतात की, शरद पवारांना राजकारणातील वाऱ्याची दिशा कळते. २०१९ प्रमाणे २०२४ मध्येही एखादा नवीन प्रयोग करून ते पुन्हा 'जोर का झटका' देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Editing by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com