बुलडाणा : एकीकडे शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाहीय, गावेच्या गावे अंधारात आहेत. मात्र दुसरीकडे आमदारांनी भूमिपूजन केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर्गत असलेल्या पूल बांधकामाच्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून एक नव्हे तर चार-चार ठिकाणी वायर टाकून विद्युत चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिवसा ढवळ्या सुरू असलेला हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला. तर ही चोरी मागील तीन महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती आहे. मात्र कॅमेरा बघताच मजुरांची धावपळ झाली. आमदार महालेंनीच आता या चोर ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनी केली आहे. चिखली (Chikhali) तालुक्यातील चिखली - धाड रस्त्यावरील साकेगाव जवळ दोन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर्गत मागील अडीच ते तीन महिन्यांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. ज्यावेळी या पुलाचे बांधकाम सुरू झाले, त्यावेळी बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील चिखलीच्या भाजप (BJP) आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी या पुलाच्या बांधकामाचे मोठ्या थाटामाटात भूमिपूजन केले. त्यानंतर कामही सुरू झाले. मात्र बांधकाम ठेकेदाराने याठिकाणी वापरण्यात येणाऱ्या मशीन्ससाठी चक्क महावितरणच्या तारांवर चार ठिकाणी वायर टाकून विद्युत चोरी सुरू केलीय.
चोरलेली वीज वेल्डिंग मशीन, स्टील कटर, मोटार पम्प, फोकस, लाइटसाठी वापरली जात आहे. अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी झाला, पुलाचे बांधकामही अर्ध्यावर झालं. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना या कामावरील वीज चोरी का दिसली नसावी? हे न उलगडणारे एक कोडेच आहे. एकीकडे शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही. गावागावांत लोडशेडिंग केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी जर चोरी केली तर त्यावर तात्काळ कारवाई होते. मात्र याठिकाणी तसे पाहायला मिळत नाहीये. उलट ठेकेदार वीज चोरी करीत असताना त्याकडे वीज वितरण कंपनी कानाडोळा करताना दिसतोय.
याविषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी ११ मार्चला या ठेकेदाराची वीज चोरी पकडल्याचे सांगितले. ठेकेदाराला १८ हजार रुपयांचा दंडही केल्याचे अधिकारी सांगतात, मात्र ठेकेदाराला अद्यापही दंडाची पावती दिली नाही. शिवाय अजूनही त्याठिकाणी दिवसा ढवळ्या चोरी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले, तर आम्ही काय त्या ठिकाणीच जाऊन थांबावे का, असा उलट प्रश्न करतात. त्यामुळे महावितरणचे अधिकारीच वीज चोरीला खतपाणी घालतात, नव्हे या वीजचोरीत सहभागी झाल्यासारखे दिसतात. अशा मुजोर आणि कामचुकार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.