गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गोंडपिपरीचे काही नगरसेवक आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले. बराच वेळ वाट बघून थकलेल्या नगरसेवकांनी मग थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची भेट घेतली. विकास कामांसाठी भाऊंची भेट घेतली असल्याचे ते सांगत असले तरी या भेटीचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत.
नगरपंचायतीच्या सत्ताबदलाचे हे संकेत तर नाहीत ना, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसचे सात, भापजचे (BJP) चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन व अपक्ष दोन असे गोंडपिपरी नगरपंचायतीत पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसने (Congress) दोन अपक्ष व दोन शिवसेनेच्या नगरसेवकांना हाताशी घेत आपली सत्ता बसविली. सविता कुळमेथे नगराध्यक्ष झाल्या. त्यांच्या कार्यकाळाला वर्ष लोटायचे आहे. अशातच शिवसेना, अपक्ष व काँग्रेसमधील काही नगरसेवकांना हाताशी धरत नगरपंचायतीत सत्ताबदल करण्याचा भाजपचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आठ नगरसेवकांनी मंत्री सुधीर मुनगंटीवारांची भेट घेतल्याने आता विविध तर्कवितर्क काढले जात आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा वेळी या निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान आमदार धोटेंसमोर आहे. राज्यात राजकीय आणीबाणीचा निर्णय झाल्यास विधानसभेच्या निवडणूक लागतील की काय, अशी शक्यता आहे. अशा वेळी गोंडपिपरी नगरपंचायतीत सत्ताबदल झाल्यास तो आमदार धोटेंना मोठा धक्का असेल. आता विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतल्याचे हे नगरसेवक सांगत आहे. पण जर , विकासाबाबत भेट घ्यायची असती तर नगराध्यक्ष सविता कुळमेथे, सभापती वनिता वाघाडेसुद्धा या भेटीच्यावेळी नगरसेवकांसोबत असायला हव्या होत्या.
विविध पक्षांच्या नगरसेवकांची मोट बांधून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. गोंडपिपरी काँग्रेसमध्ये आमदार सुभाष धोटेंविषयी नाराजी आहे. चौधरींचा भाजप प्रवेश, चंदेल यांनी दिलेला घरचा अहेर आणि त्यानंतर रामचंद्र कुरवटकर यांनी घेतलेली वेगळी भूमिका आमदार धोटे व काँग्रेस पक्षाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. अशातच आता सत्ताधारी नगरसेवकांपैकी काहींनीं मोट बांधल्यानं नगरपंचायतीत शिंदे पॅटर्न तर होणार नाही ना, अशी शंका राजकीय वर्तुळात घेतली जात आहे. असे झाल्यास तो आमदार सुभाष धोटे व कॉंग्रेस नेते अरूण धोटे यांना मोठा धक्का असेल.
आमदारांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी दोन वेगवेगळे गट गेले. पहिल्या गटाला सुभाष धोटेंनी भेट देत शुभेच्छा स्वीकारल्या. पण दुस-या गटाला बरीच वाट बघावी लागली. यानंतर दुसऱ्या गटाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. गेल्या तीन-चार दिवसांत घडलेल्या या राजकीय घडामोडींकडे सत्तापरिवर्तनाचे संकेत म्हणून बघितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.