Nagpur Division Teachers Constituency Elections : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) समर्थीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. आता अडबालेंच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेली बलस्थाने कोणती, जाणून घेतली पाहिजे. कारण या विजयात सिंहाचा वाटा कुणाचा, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.
भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे, असे नेहमीच म्हटले जाते. पण नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक आणि नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉंग्रेस पक्षात देखील शिस्त बघायला मिळाली. कॉंग्रेससह महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांनीदेखील शिस्तीचे पालन केले. त्यामुळे पदवीधरसह यावेळच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजयश्री खेचून आणली.
आम्ही एकत्र आलो तर आम्हाला कुणीही हरवू शकत नाही, हा संदेश आज कॉंग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा दिला. पदवीधरप्रमाणेच ही निवडणूक राज्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी अंगावर घेतली होती. बैठका लावणे असो की प्रचाराचे नियोजन प्रत्येकच बाबतीत त्यांनी कौशल्यपूर्ण काम केले. अगदी सुरुवातीपासून पाठिंबा कुणाला द्यावा आणि स्ट्रॅटिजी काय असावी, याबद्दल ते आग्रही होते. प्रत्येक आघाडीवर त्यांनी आक्रमकपणे (स्वभावानुसार) काम केले आणि त्याचा फायदा आज झाला.
सुनील केदारांना भक्कम साथ मिळाली ती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Taywade) यांची. शिक्षण क्षेत्रात ‘तायवाडे सर’, अशी ओळख वर्षानुवर्षांपासून असलेल्या डॉ. तायवाडेंनी सुधाकर अडबाले यांच्यासाठी शिक्षकांच्या सर्वच्या सर्व तब्बल ३४ संघटनांचा पाठिंबा मिळविला. त्याशिवाय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे फार मोठे संघटन आहे. यापूर्वी विमाशिचे व्ही. यू. डायगव्हाणे दोन वेळा शिक्षक आमदार राहिलेले आहेत. त्या संघटनाचा फायदाही सुधाकर अडबाले यांना झाला. त्यात डॉ. तायवाडे यांनी शिक्षक संघटनांचे ‘परफेक्ट मॅनेजमेंट’ करून केदारांच्या नियोजनाला भक्कम साथ दिली.
याशिवाय कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर, (Balu Dhaorkar) माजी मंत्री विजय वडेट्टीवार, (Vjay Wadettiwar) आमदार अभिजित वंजारी, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनीही ताकदीने किल्ला लढवला आणि एकत्र राहिल्यास कॉंग्रेसपासून भविष्यातील विजय लांब नाही, हे दाखवून दिले. कॉंग्रेसच्या या मातब्बर नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने भक्कम साथ दिली.
विदर्भात राष्ट्रवादी आणि सेनेची ताकद तुलनेत कमीच आहे. पण भविष्यात त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी निवडणुकीत गांभीर्य दाखवले. एकंदरीतच हा महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांचा विजय आहे. तरीही विजयात सिंहाचा वाटा म्हणून आमदार सुनील केदार आणि डॉ. बबनराव तायवाडे यांचे नाव घेतले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.