नागपूर : महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये होऊ घातली असून नगरसेवकांनीही तयारी सुरू केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही नगरसेवकांनी वस्ती व रस्त्याची माहिती देणाऱ्या फलकांवर भर दिला आहे. परंतु एकाच प्रभागातील एकाच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी एकाच वस्तीची माहिती देण्यासाठी दोन वेगवेगळे फलक लावले आहे. एकाच प्रभागात असताना एकाच ठिकाणी दोन फलक लावण्यातून नगरसेवकांत समन्वय नसल्याचे स्पष्ट होत असून महापालिकेच्या पैशाचाही चुराडा होत आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये समन्वय राहिलेला नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिका कशी जिंकणार, असा प्रश्न या प्रभागातील नागरिक विचारत आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यातच महापालिकेत सदस्यांची संख्या वाढणार असल्याने नगरसेवकपदासाठी इच्छुकांत उत्साहाचे वातावरण आहे. परंतु सद्यःस्थितीतील काही नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही? याबाबत चिंता लागली आहे. विशेषतः सत्ताधारी नगरसेवकांत उमेदवारीवरून भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही नगरसेवकांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. नगरसेवकांची नावे लोकांच्या डोळ्यापुढे दिसावी, यासाठी काही नगरसेवकांनी रस्ते, वस्त्यांची माहिती देणारे फलक मुख्य मार्गावर लावण्याचा सपाटा सुरू केला, तर काही नगरसेवक घरोघरीदेखील पोहोचत आहेत.
रस्त्यांची किंवा वस्तीची माहिती देणारे फलक एकदा लावल्यानंतर ते अनेक वर्षे कायम राहतात. अजूनही जुन्या नगरसेवकांनी लावलेले फलक त्यांच्या नावासह वर्षानुवर्षे कायम आहेत. त्यामुळे आत्ताच्या नगरसेवकांनीही हाच मार्ग पत्करला. भविष्यात ते नगरसेवक राहतील की नाही, याची शाश्वती नाही. परंतु त्यांच्या नावाचे फलक मात्र कायम राहणार आहे. हे फलक लावताना एकाच प्रभागातील नगरसेवकांत स्पर्धा दिसून येत आहे. दक्षिण नागपुरातील प्रभाग ३२ मधील नगरसेवक व नगरसेविका, यांच्यात अशीच स्पर्धा या फलकामुळे स्पष्ट दिसून येत आहे.
दोन्ही नगरसेवकांनी एकाच ठिकाणी एकाच रस्त्याची माहिती देणारे दोन वेगवेगळे फलक लावले आहेत. उदयनगर चौक ते अयोध्यानगर मार्गावर गजानन शाळेच्या जवळून अयोध्यानगर वस्तीमध्ये जाणारा जोडरस्ता आहे. या जोडरस्त्यावर नगरसेविका रुपाली ठाकूर व नगरसेवक अभय गोटेकर यांनी अयोध्यानगर वस्तीकडे जाणारा मार्गाची माहिती देण्यासाठी फलक लावला. दोघांचेही फलक आजूबाजूलाच लावण्यात आले आहे. एकाने फलक लावल्यानंतर दुसऱ्याने त्याच ठिकाणी फलक लावणे म्हणजे भाजपमधील या दोन्ही नगरसेवकांत मतभेद अधोरेखित करीत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नगरसेवक एकाच प्रभागाचे असून जवाहरनगरात एकमेकांचे शेजारीही आहेत.
कुठल्याही रस्त्याची माहिती देण्यासाठी एक फलक पुरेसा आहे. एका नगरसेवकाने फलक लावल्यानंतर त्याच ठिकाणी, तीच माहिती देणारा दुसरा फलक दुसऱ्या नगरसेवकाने लावणे, म्हणजे दोन्ही नगरसेवकांत समन्वय नसल्याचे स्पष्ट करीत आहे. याशिवाय दुसरा फलक लावणाऱ्या नगरसेवकाची ही कृती महापालिकेच्या पैशाचा चुराडा करणारी आहे. नागरिकांना दिलेल्या कर स्वरूपात दिलेल्या पैशाची ही उधळण आहे.
- अरविंद क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.