Uddhav Thackeray on Border dispute : हिवाळी अधिवेशनात आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे विधीमंडळात चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी जोपर्यंत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत हा संपूर्ण परिसर केंद्रशासित करावा अशी मागणी ठाकरे यांनी सभागृहात केली आहे.
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवारी सकाळीच विधानभवनात दाखल झाले. सभागृहात ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, उध्दव ठाकरे यांनी सीमावादावर परखड भूमिका मांडली. ठाकरे म्हणाले, सीमावादवर सभागृहाच्या सर्व सदस्यांचं एकमत झालं ही चांगली बाब आहे. मात्र, एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे कर्नाटकची बाजू मांडत आहे. त्यावेळी आपले मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री बघ्याची भूमिका का घेत आहेत. सीमावादाच्या मुद्द्यावर दिल्लीत मुख्यमंत्री तोंड का उघडत नाही.
तसेच सीमावाद सोडविण्यासाठी आमच्या सरकारने तुमच्या सरकारने काय केलं हे करत बसण्यापेक्षा त्यावर तोडगा काढला जाणे आवश्यक आहे. तसेच सीमावाद सोडविण्यासाठी आता सगळ्यात जास्त पूरक वातावरण आहे. कारण दोन्ही राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री आहे. आणि हे दोन्हीही मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना आपला नेता मानतात. त्यामुळे सीमावादावर तोडगा निघायला हवा असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
याच सभागृहात कुणीतरी आम्ही कर्नाटकमध्ये लाठ्या खाल्ल्याचा उल्लेख केलेला माझ्या कानावर आलं.पण तुम्ही ज्यावेळी कर्नाटकमध्ये जाऊन लाठ्या खाल्या, त्यावेळी तुम्ही शिवसेनेत होता.पण आता तुम्ही सीमांतर केल्यानंतर किती लाठ्या खाल्ल्या? असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावतानाच ठाकरे यांनी तसेच आणखी किती लाठ्या कर्नाटकमधील मराठी भाषिकांनी खायला हव्यात असा सवालही उपस्थित केला.
सीमावाद न्यायप्रविष्ट असताना देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत ठराव मांडताना महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नसल्याची भूमिका मांडली. अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मांडू शकतात का? आणि सीमावादावर बोलणार्या संजय राऊत यांना त्यांनी चीनी एजंट म्हटले. पण त्यांनी हा शोध कधी लावला कुणास ठाऊक असेही ठाकरेॆनी यावेळी सांगितले.
जोपर्यंत हे सीमावादाचं प्रकरण न्यायालयात आहे तोपर्यँत हा सगळा प्रदेश केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात यावा. आणि तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा अशी जोरदार मागणी सभागृहात केली. महाराष्ट्रात नुसत्या दुकानाच्या पाट्या मराठीत हव्या असा आग्रह धरला तर त्याविरोधात लोकं न्यायालयात गेले आहेत. तिकडे कर्नाटकात मराठी पाट्या लावल्या तर राजद्रोह मानला जातो असा हल्लाबोलही ठाकरेंनी केला.
एकही कर्नाटकचा मंत्री हा महाराष्ट्रात येऊन माझा जन्म महाराष्ट्रात घ्यावा असं म्हणत नाही पण महाराष्ट्राचे मंत्री मात्र, कर्नाटकात जाऊन जन्म घ्यावा तो कर्नाटकात घ्यावा असं बोलले आहेत. असे मंत्री जर असतील तर त्या सीमावर्ती भागातील अन्यायग्रस्त जनतेने कुणाकडून न्यायाची अपेक्षा करायची अशा शब्दांत ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.