Gopal Datkar on Hunger Strike : दिवाळीचा उत्सव काही दिवसांवर आला असताना शेतकऱ्यांच्या घरात अंधार पसरल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट पुन्हा अकोला येथे आक्रमक झाला. शेतकऱ्यांना कोणतीही मदत न मिळाल्यानं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर (Gopal Datkar) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं बेमुदत उपोषण सुरू केलंय. ठाकरे गटातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्यासह शिवसैनिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई देण्यात यावी, पीकविम्याची रक्कम मिळावी, खरीप हंगामात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या नुकसानाची भरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. (Uddhav Thackeray Group's District Chief Gopal Datkar from Akola on Hunger Strike for Farmers)
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमासंदर्भात अधिसूचना काढली होती. त्यात पीक विम्याची २५ टक्के रक्कम तत्काळ देण्यात यावी असं नमूद होतं. यावर्षीही पावसात खंड पडल्यानं शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के रक्कम मिळणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही. त्यामुळं शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. यापूर्वीही याच मुद्द्यावर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलंय. मात्र, मदत न मिळाल्यानं आता दातकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय.
२०२२-२३ मध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची रक्कम शासनाने जाहीर केलीय. त्यानुसार हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे ती हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, असा आंदोलकांचा आग्रह आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्सव साजरा करता येईल, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याबाबत अधिसूचना काढल्यानंतरही जमा न झालेली रक्कमही आंदोलकांना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हवीय. २०२३-२४ च्या खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यानं विम्याची २५ टक्के रक्कमही देणे कंपन्यांवर बंधनकारक आहे, असं दातकर यांच्यासह आंदोलकांनी नमूद केलंय.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी अकोल्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात आढावा घेतल्याची माहिती प्रशासनानं आंदोलकांना दिली. मात्र, शासकीय विश्रामगृहात अशी कोणतीही आढावा बैठकच झाली नाही. अधिकारी खोटं बोलत असल्याचं नमूद करीत दातकर यांनी उपोषण सुरू केलं. ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाल्यानं दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटण्यास अकोल्यात पुन्हा एकदा सुरुवात झालीय. दिवाळी केवळ चार दिवसांवर आली असताना एवढी मोठी रक्कम विम्या कंपन्यांकडून वसूल करीत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्याचं आव्हान प्रशासकीय यंत्रणेपुढं आता उभं आहे.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.