Vijay Wadettiwar News: विजय वडेट्टीवारांनी धानोरकरांचा असा केला पत्ता कट ? राजकीय चर्चांना उधाण

Vijay Wadettiwar and MLA Pratibha Dhanorkar : विजय वडेट्टीवार यांनी आमदार प्रतिभा धानोरकरांना फोटोतून गायब केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Vijay Wadettiwar News
Vijay Wadettiwar NewsSarkarnama

Chandrapur News: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मनीष पाटील यांचा विजय झाला. त्यांच्या विजयानंतर आमदार प्रतिभा धानोरकर, माणिकराव ठाकरे, माजी आमदार वामनराव कासावार आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या अभिनंदनाचे फोटो विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुकवर शेअर केले. मात्र, त्यांनी शेअर केलेल्या फोटोत धानोरकरांचा पत्ता कट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

विजय वडेट्टीवारांनी फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोत आमदार धानोरकर यांचा फोटो गायब करण्यात आला. पण मूळ फोटोत मात्र आमदार धानोरकर या दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार अनवधानाने झाला की जाणीवपूर्वक, याची चर्चा आता चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांसह राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पक्षाने एवढी मोठी जबाबदारी देऊनही वडेट्टीवारांना त्यांच्याच जिल्ह्यातील आणि स्वपक्षातील आमदारांच्या फोटोचा त्रास का होत आहे ? ही वर्तणूक राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची नव्हे, तर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची आहे, अशी टीकाही त्यांच्यावर होत आहे.

Vijay Wadettiwar News
Yavatmal District Bank : महाविकास आघाडीची सरशी, तर महायुतीच्या नेत्यांना चपराक; अध्यक्षपदी मनीष पाटील !

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी यवतमाळ जिल्हा बँकेत बहुमत नसताना टिकाराम कोंगरे यांना अध्यक्षपदी बसवले होते. या सर्व घडामोडींमध्ये धानोरकरांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचे निधन झाले आणि बँकेतील समीकरणे बदलली. आता मनीष पाटील अध्यक्ष झाले. त्यांच्या निवडीतही आमदार प्रतिभा धानोरकर यांची मोलाची भूमिका राहिली.

अध्यक्षपदाची सूत्रं पाटील यांनी स्वीकारली तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. त्यात आमदार प्रतिभा धानोरकर यांचाही समावेश होता. पण वडेट्टीवारांच्या फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या फोटोतून आमदार धानोरकरांना गायब करण्यात आले.

बाळू धानोरकर आणि वडेट्टीवारांचे फारसे सख्य नव्हते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर खासदार बाळू धानोरकर यांनी संसदेत, तर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. संचालक मंडळाची मुदत झाली आहे. त्यामुळे नोकर भरतीला परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली होती. तब्बल ३६० जागांच्या नोकर भरतीसाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले होते. पण परवानगी मिळून अद्याप नोकर भरती झाली नाही.

वडेट्टीवारांचे निकटवर्तीय संतोष रावत बँकेचे अध्यक्ष आहेत. खासदार धानोरकरांच्या हयातीत जिल्हाध्यक्ष प्रकाश देवताळे यांच्या उचलबांगडीचा मुद्दाही गाजला. देवतळे यांनी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपशी युती केली होती. त्यामुळे त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. देवतळेसुद्धा वडेट्टीवारांचे समर्थक होते. खासदार धानोरकरांच्या निधनानंतर परिस्थिती फारशी बदलली नाही. आमदार प्रतिभा धानोरकर यांना मिळेल तिथे डावलण्याचा प्रयत्न वडेट्टीवार गटातून केला जात आहे.

दरम्यानच्या काळात वडेट्टीवार आपला मतदारसंघ सोडून वणीपर्यंत पोहोचले. शेवटी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी लोकसभेचा उमेदवार याच मतदारसंघातील असेल, असे सांगितले. त्यानंतर वडेट्टीवारांचे विमान जमिनीवर उतरले.

खासदार धानोरकरांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर दुःखातून सावरणार नाही, असा समज होता. मात्र, आमदार धानोरकरांनी त्यांच्या वरोरा विधानसभा मतदारसंघासह चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला. त्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणखी सक्रिय झाल्याचे बोलले जाते.

वडेट्टीवार राज्याचे विरोधी पक्षनेते झाले. त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्यांच्या विरोधात पक्षातील २८ आमदार होते, असा गौप्यस्फोट आमदार धानोरकरांनी केला. त्यामुळे सत्कारांच्या कार्यक्रमाला वेगळाचा रंग चढला आणि वडेट्टीवार चांगलेच दुखावले. वडेट्टीवारांच्या समर्थकांना धानोरकरांचा फोटो नको, एवढे दोन नेत्यांमधील संबंध ताणले गेले आहेत. पण आता खुद्द वडेट्टीवारांनाही धानोरकरांचा फोटो का नको आहे ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या विजयानंतर त्यांना शुभेच्छा देताना काँग्रेस नेत्यांनी सामूहिक फोटोसेशन केले. या फोटोत आमदार प्रतिभा धानोरकर होत्या. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या अधिकृत फेसबुक आयडीवरून मनीष पाटील यांचे अभिनंदन केले.

अभिनंदन करताना त्यांनी हाच फोटो वापरला. मात्र, या फोटोतून आमदार प्रतिभा धानोरकर यांना गायब केले. मनीष पाटलाच्या अगदी जवळ आमदार धानोरकर उभ्या असतानादेखील धानोरकर फोटोतून गायब झाल्यामुळे हे चुकीने नाही तर जाणीवपूर्वक घडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Vijay Wadettiwar News
Dhangar Reservation : विखे पिता-पुत्रांविरोधात चौंडीत घोषणाबाजी; आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने धनगर समाज नाराज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com