Bhandara District Political News : मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. तरीही सरकार मराठ्यांना अद्याप आरक्षण देऊ शकले नाही आहे. त्यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, आंदोलन सुरू केले आहे. (Village leaders have been banned in many villages)
अनेक गावांत पुढाऱ्यांना गावबंदी कऱण्यात आली आहे. यावर आज (ता. २६) भंडाऱ्यात आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पुढाऱ्यांना गावबंदी केली असली तरी काही फरक पडणार नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर नेत्यांना गावबंदी करून काहीही फायदा होणार नाही, असे मत नागपुरात नुकतेच व्यक्त केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्री गावितांनीही बावनकुळेंच्या सुरात सूर मिसळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देण्यास सकारात्मक आहेत. त्यासाठी काल (ता. २५) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. लवकरच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे थोडा धीर ठेवण्याची गरज असल्याचेही विजयकुमार गावीत म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मराठा आरक्षणाचा मुद्दा स्फोटक होत चालला आहे. शेकडो गावांत आमदार, खासदारांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. याचा फटका मंत्री आमदार, खासदारांना बसत आहे. मराठा तरुण लोकप्रतिनिधींवर प्रश्नांचा भडिमार करत आहेत.
विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना लोकप्रतिनिधींच्या नाकीनऊ येत आहेत. कशीबशी उत्तरं देऊन वेळ मारून पळ काढावा लागत असल्याने लोकप्रतिनिधी सध्या हैराण झाले आहेत. गावबंदी झालेल्या गावांत गेल्यास तणाव निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यांतील वेगवेगळ्या गावांमधील दौरे रद्द केले आहेत.
मराठा समाजाला आरक्षणासाठी पुन्हा एकदा व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. हीच मागणी घेऊन अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने आरक्षणासाठी ३० दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र, मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी १० दिवसांचा अधिकचा वेळ देऊन सरकारवर आरक्षणासाठी दबाव वाढवला होता.
जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली गावात आले होते. मात्र, सरकारकडून आरक्षणासाठी अपेक्षित हालचाली होत नसल्याचे लक्षात येताच गावबंदीचे शस्त्र उपसण्यात आले आहे. कालपासून (ता. २५) जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधीही पेचात पडले असून, कधी एकदा आरक्षणाचे भूत मानगुटीवरून उतरते, याची वाट राज्यकर्ते पाहत आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.