Maratha Aarakshan News : मराठा आरक्षणाची सर्वच राजकीय नेत्यांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. मराठा समाज आक्रमक होत, सर्वपक्षीय नेत्यांना गावागावांत प्रवेशबंदी केली जात आहे. आता उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा समाजाला सर्व स्तरांवर टिकेल, असे आरक्षण देत सर्व विभागातील नोकर भरतीत सामावून घ्यावे, तोपर्यंत नोकर भरतीच करू नये, अशाही मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सारथी संस्थेमार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची व्याप्ती वाढवावी, मराठा समाजातील मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहाची उभारणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, "शेती हा मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, शेतीचे झालेले विभाजन व सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हा समाज आर्थिकदृष्ट्या मागास राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील नागरिक आरक्षणाची मागणी करत आहेत.
यामुळे काही वर्षांपूर्वी मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत सहभागी होत शांततेत मोर्चे काढले होते. त्या सर्व मोर्चामध्ये आपण समन्वयाची भूमिका घेत होता, हे आम्ही पाहिले आहे. मराठा समाज आपल्याकडे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आशेचा किरण म्हणून पाहत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका सुरुवातीपासून सकारात्मक आहे. सध्या मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व गावागावांत साखळी उपोषण करण्यात येत आहे."
"समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या असून, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. मराठा समाजाला सर्व स्तरांवर टिकेल, असे आरक्षण देऊन महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व विभागांतील नोकर भरतीमध्ये सामावून घ्यावे, तोपर्यंत नोकरभरती थांबवावी.
याचबरोबर सारथी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ जास्तीत-जास्त मराठा समाजातील मुलांना मिळवून द्यावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटी रद्द करून मराठा समाजातील लाखो तरुण- तरुणींना उद्योग किंवा व्यवसायासाठी तत्काळ व सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा मुला-मुलींना स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध करून द्यावेत," आदी मागण्याही आमदार चौगुले यांनी केल्या आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.