वाघमारेंचा गट संतापला, मोहाडी नगरपंचायत घडविणार भाजपात राजकीय भूकंप?

भाजपचे (BJP) माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांनी स्वतःची होणारी गळचेपी बोलून दाखविल्याने भाजपमध्ये आपसी वर्चस्वाचा वाद (Dispute) प्रखर असल्याचे दिसत आहे.
Charan Waghmare, BJP
Charan Waghmare, BJPSarkarnama
Published on
Updated on

भंडारा : भंडारा (Bhandara) भाजपात अंतर्गत असलेली गटबाजी आता चव्हाटयावर येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे (BJP) माजी आमदार चरण वाघमारे यांनी स्वतःची होणारी गळचेपी बोलून दाखविल्याने भाजपमध्ये आपसी वर्चस्वाचा वाद प्रखर असल्याचे दिसत आहे. याच आपसी मतभेदातून निर्माण झालेल्या वादामुळे येत्या काही दिवसांत होणारी मोहाड़ी नगरपंचायतीची अध्यपदाची निवडणूक भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप घडविणार, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

निवडणुकीच्या (Election) दृष्टिने घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे फेब्रूवारी हा अतिशय संवेदनशील महिना ठरणार, असे दिसते. अवघ्या काही दिवसांत जिल्हा परिषद व नगरपंचायतींच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूक होणार आहे. अध्यक्ष आपलाच असावा, यासाठी जिल्ह्यात प्रत्येक पक्षाने घोड़ेबाजाराला सुरुवात केल्याची माहिती आहे. याउलट भाजपमध्ये मात्र अंतर्गत घोड़ेबाजार पहायला मिळतो आहे. भंडारा जिल्ह्यात मोहाड़ी आणि लाखांदूर या नगरपंचायतींवर भाजपाने बहुमत मिळविले आहे. मोहाड़ी नगरपंचायतीत 17 जागापैकी 9 जागा भाजपाने जिंकल्या आहे. आता येथे बहुमत असल्याने भाजप सत्ता स्थापन करेल, हे स्पष्ट असतानाही मोहाड़ी नगर पंचायतीमध्ये सुरु असलेले भाजपचे अंतर्गत राजकरण सर्वांना भुवया ऊंचवायला भाग पाडत आहे.

भाजप खासदार सुनील मेंढे यांनी नुकत्याच घेतलेल्या मोहाड़ी नगरपंचयतीसंबंधीच्या बैठकीत भाजपे 9 पैकी 5 नवनिर्वाचित नगरसेवक हजर होते. बाकी 4 नगरसेवक गैरहजर होते. महत्वाचे म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरिपुंजे यांनी मोहाडी नगरपंचायतीत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणाऱ्या अधिकृत गटाच्या प्रमाणपत्राच्या वेळी बोलावलेल्या बैठकीत केवळ हे 5 नगसेवक हज़र होते. त्यामुळे नाईलाजाने गिरिपुंजे यांना 5 नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटांचे प्रमाणपत्र सादर करावे लागले आहे. मोहाड़ी नगरपंचयतीमध्ये भाजपच्या तिकीटावर 9 नगरसेवक निवडून आले असताना केवळ 5 नगरसेवकांच्या अधिकृत गटांचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याची नामुश्‍की भाजपवर का आली, इतर 4 नगसेवक का ग़ैरहजर होते, या प्रश्‍नांची उत्तरे शोधली जात आहेत.

Charan Waghmare, BJP
भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी पोहोचली चरम सीमेवर...

विशेष म्हणजे हजर असलेले 5 नवनिर्वाचित नगरसेवक हे चरण वाघमारे यांच्या गटाचे असल्याचे सांगितले जाते. त्यांना होणारा विरोध 4 नगसेवक ग़ैरहजर असल्याच्या प्रकाराला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मोहाड़ी नगर पंचायतीमध्ये ज्या भाजप अधिकृत गटाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले आहे. त्यात हेमचंद पराते, यादोराव कुंभारे, पूनम धकाते, अश्विनी डेकाटे, सविता साठवने या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या समावेश आहे. इतर 4 भाजपाच्या नगरसेवकांचे त्यात नाव नाही. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. हे सदस्य राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या संपर्कात तर नाही ना, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मोहाड़ी नगर पंचायतीचे अध्यक्षपद महिला अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजपशिवाय कोणत्याही पक्षाची महिला अनुसुचित जातीची नगरसेवक नाही. तर पक्षीय बलाबल बघता भाजप 9, राष्ट्रवादी कॉंग्रेस 6 व कांग्रेस 2 असे आहे. राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस 3 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे येथेच तर घोडाबाजार होत नाहीये ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

या सर्व प्रकाराने माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गट चांगलाच संतापलेला असून आपल्या नेत्याचे पक्षात होणारे खच्चिकरण लक्षात घेता वाघमारे गट आपली वेगळी चूल मांडण्‍यास तयार झाला आहे. तर आपल्याच मोहाड़ी नगरपंचायतीत दगाफटका झाल्यास 6 जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेस पाठबळ देतील, असे उघड़ वक्तव्य चरण वाघमारे गट करू लागला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सहा हात दूर असलेल्या काँग्रेसला आयते पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे मोहाड़ी नगर पंचायतीची अध्यक्षपदाची निवडणूक भाजपात मोठा राजकीय भूकंप घडवीणार असल्याचे आता जाणकार सांगत आहेत. भाजपामध्ये निर्माण झालेली आणिबाणीची परिस्थिती बघता, आता या परिस्थितीकडे वरिष्ठ नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com