नागपूर : शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे अनेक नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडींनंतर मुख्यमंत्री झाले. पाहता पाहता त्यांनी विश्वासमतही सिद्ध केले. पण काहीच दिवसांपूर्वी त्यांचे पुतळे जाळले गेले, त्यांच्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली गेली. आज सभागृहात चौफेर फटकेबाजी करीत त्यांनी त्या सर्वांचे हिशेब चुकते केले.
बंडखोरी केल्यानंतर अगदी सुरुवातीच्या क्षणापासून सर्व घडामोडी त्यांनी सभागृहात सांगितल्या आणि बऱ्याच वेळी हंशा पिकवला. महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातच्या (Gujrat) सीमेवर कशी नाकेबंदी करण्यात आली, याचा रंजक किस्साही त्यांनी सांगितला. मी शिवसैनिक आहे अन् नाकाबंदी कशी तोडायची आणि निघायचे, हे चांगल्या पद्धतीने माहिती असल्याचे ते म्हणाले. सभागृहातील सर्वांचेच त्यांनी आज चांगले मनोरंजन केले. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) सर्वाधिक वेळा घेतले आणि त्यांच्या रोखठोक स्वभावाचे कौतुकही केले. सलग सात वेळा निवडून येण्याचा विक्रमही अजित दादांच्या नावावर आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जरी पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश करण्यात आला. पण तरीही वर्क फ्रॉम होम वाले मुख्यमंत्री आहे, असेच त्यांच्या बाबतीत त्यांच्या कार्यकाळात बोलले गेले. ते स्वकर्तृत्वाने नाही, तर वाड वडिलांच्या पुण्याईमुळे मुख्यमंत्री झाले, असाच एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याचा सूर होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन वयाच्या १७व्या वर्षी मी शिवसेनेशी जुळलो, तो आजतागायत शिवसेनेतच आहे. पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो नाही, असा जबरदस्त टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ‘माणूस जेव्हा आपल्या सौभाग्याला आपले कर्तृत्व समजायला लागतो, तेव्हा त्याचे पतन सुरू होते.’, असे ट्विट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते, त्याची आठवण शिंदेंच्या टोल्यानंतर अनेकांना झाली.
संजय राऊतांचाही घेतला समाचार..
मुख्यमंत्री शिंदे यांनी आजच्या भाषणात संजय राऊत यांच्या तेव्हाच्या वक्तव्यांचाही खरपूस समाचार घेतला. आमचा बाप काढला गेला, लायकी काढली गेली, भाजीवाला, रिक्षावाला म्हणून हिणवले गेले. अरे.. शिवसेना उभी करण्यासाठी आम्ही झटलो. पोटासाठी आपले व्यवसाय करून बाळासाहेबांसोबत सैनिक म्हणून आम्ही उभे राहिलो. भाजीवाला असो रिक्षावाला छोटा व्यवसाय करणे काही पाप नाही, हे तरी त्यांना लक्षात ठेवायला पाहिजे होते, असे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले.
अन् मुख्यमंत्र्यांचे डोळे पाणावले..
माझ्या डोळ्यांदेखत माझी दोन मुले बुडाली. तेव्हा पार तुटून गेलो होतो. पण त्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी त्या काळात मला व माझ्या कुटुंबाला मोठा आधार दिला आणि त्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती दिली, असे एकनाथ शिंदे म्हणाले. हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी लगेच अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.