

अकोट : बिश्नोई गॅंगकडून अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मागणीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे अकोट शहराध्यक्ष हरिष टावरी यांना धमकीचा कॉल आल्याने संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संबंधितांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन ते चार दिवसांपूर्वी टावरी यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख शुभम लोणकर अशी करून दिली. त्याने आकोट मतदारसंघातील आमदाराकडून दोन कोटी रुपये वसूल करून देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास टावरी आणि संबंधित आमदार यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी थेट धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासन तातडीने सतर्क झाले असून संपूर्ण प्रकरण अत्यंत गोपनीयतेने हाताळले जात आहे. अधिकृत स्तरावर कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नसली, तरी शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल क्रमांक, कॉलसाठी वापरलेले अॅप तसेच संबंधित तांत्रिक माहितीची सखोल तपासणी सायबर तज्ज्ञांकडून सुरू आहे. कॉलचा स्रोत, त्यामागील व्यक्तींची ओळख आणि संभाव्य गुन्हेगारी जाळ्याशी असलेला संबंध याचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध तांत्रिक पुरावे तपासत आहेत. राजकीय पदाधिकाऱ्याला थेट मोठ्या रकमेच्या खंडणीची मागणी करत जीवघेणी धमकी दिल्याच्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता कमी असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणामागील सत्य समोर आणण्यासाठी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून प्रशासनाच्या पुढील हालचालींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जीवावर उठलेल्या बिश्नोई गँगचा भारतात अनेक भागात विस्तार होताना दिसतो आहे. या गँगकडून वर्षभरापूर्वी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली होती. तसंच पंजाबमध्ये प्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचा तरुण नेता सिद्धू मुसेवाला याची देखील बिश्नोई गँगनं गोळ्यांचा वर्षावर करत हत्या केली होती.
त्यामुळं एकीकडं नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकारनं कंबर कसली असताना दुसरीकडं बिश्नोई गँगसारख्या गुंडांचा बिमोड कधी होणार? असा सवालही उपस्थित होत आहे. आता भाजपच्या नेत्यांपर्यंतच हा फास येऊन पोहोचल्यानं आता तरी या गँगचा कार्यक्रम होणार का? असा गंभीर सवाल विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.