

ZP President Election: राज्यात नुकत्याच १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका एकाच दिवशी करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. पण यांपैकी ५ जिल्हा परिषदांमध्ये भाजपचं गणित अद्याप जुळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं जोपर्यंत आपल्या मनासारखं सर्वकाही होत नाही तोपर्यंत या १२ झेडपीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी रखडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि धाराशिव या पाच जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. यातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि धाराशिवमध्ये भाजपचा अध्यक्ष व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची बोलणी सुरु आहे.
तर रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं या ५ जिल्हा परिषदांमध्ये जोपर्यंत भाजपचे गणित जुळत नाही, तोपर्यंत इतर ७ जिल्हा परिषदांचेही अध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. कारण प्रशासनानं एकाचवेळी १२ जिल्हा परिषदांच्या नियुक्त्या जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर अधिसूचना काढण्यात आली की, कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून सभापती त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडीची प्रक्रिया केली जाते. पहिली सभा बोलवण्याच्या अधिकारदेखील जिल्हाधिकाऱ्यांना आहे. आता निकाला जाहीर होऊन १० दिवस झाले आहेत. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांना याकडं दुर्लक्ष करता येणार नाही.
पण किमान पुणे विभागामध्ये पाच जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱी निवडणुकीची तारीख एकसारखी असावी असा देखील प्रयत्न विभागीय आयुक्त स्तरावर सुरू आहे. कारण वेगवेगळ्या तारखा दिल्यास प्रवर्गाचा कालावधी वेगळ्या तारखेला संपेल आणि निवडणुका ही भविष्यात वेगळ्या तारखांना घ्याव्या लागतील. पुणे जिल्ह्यात निवडणूक प्रशासनाकडून निवडणुकांच्या तारखेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्याचं कळतं आहे. त्यानुसार, फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.