Yavatmal News : यवतमाळ येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांचा तोल जाणार तोच व्यासपीठावरून लोकांनी व त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरले. त्यांना शहरातील नामांकित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यावर गडकरींनी आपल्यातील झुंजार वृत्तीचे दर्शन घडवत पुन्हा एकदा सभास्थळी धाव घेतली. एवढंच नव्हे तर जोरदार भाषणही ठोकले.
सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू असून, दुसरीकडे उन्हाचा तडाखाही बसत आहे. प्रचारादरम्यान, उन्हाच्या झळांचा सामनाही विदर्भ, मराठवाड्यात नेते व कार्यकर्ते यांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भरसभेत चक्कर आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज यवतमाळच्या पुसद येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. गडकरी यांना चौथ्यांदा भोवळ येण्याची वेळ आहे. अंगाची लाही लाही करणारं ऊन, उच्च रक्तदाब, शुगरचा त्रास यामुळे त्यांना भोवळ आल्याचं बोललं जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे गट शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसद येथील शिवाजी ग्राउंडवर आज महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यासभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नितीन गडकरी यांना भोवळ आल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरलं. अन्यथा ते जमिनीवर कोसळले असते. यापूर्वीही नितीन गडकरी यांना सभेत भोवळ येण्याची घटना घडली आहे. यापूर्वी त्यांना उन्हामुळे भोवळ आली होती. आजही त्यांना भर व्यासपीठावर भाषण करत असताना भोवळ आली. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रचारसभेत भाषण करताना अचानक भोवळ आली. त्यानंतर कार्यकर्ते मदतीला धावले. गडकरी यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. भोवळ आल्यानंतर काही वेळातच बर वाटू लागले. त्यानंतर गडकरी पुन्हा भाषणासाठी मंचावर आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर गडकरी यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
सिंचन, ऑर्गनिक फार्मिंग, मोदी सरकारने ही धोरणे आखली आहेत, त्याचा लाभ आता दिसत आहे. गाव समृद्ध कसे होईल, हा यामागचा विचार आहे. देशात मोदी सरकार आणायचे असेल तर यवतमाळ-वाशिम लोकसभेतून राजश्री पाटील यांना लोकसभेत पाठवा, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
उन्हामुळे हेलिकॉप्टरमधील एसी बंद होता. त्यामुळे हवा नव्हती आणि आणि तापमान जास्त असल्यामुळे मला त्रास झाला. मात्र थोडा आराम करून पुन्हा आलो. त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल मी क्षमा मागतो, असे म्हणून गडकरी यांनी आपले पुसद येथील भाषण संपविले.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.