नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आणि नागपूर जिल्हा परिषदेत १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा झंझावात आणि मतदारांनी कॉंग्रेसला दिलेली पसंती यांमुळे कॉंग्रेसचे संख्याबळ वाढले. आता उपाध्यक्ष आणि गटनेत्याची निवड होणार आहे. उपाध्यक्षपदी महिला तर गटनेतेपदी पुरुष सदस्याची निवड होणार असल्याची माहिती आहे.
अध्यक्षांपाठोपाठ आता पुन्हा एकदा उपाध्यक्ष पदही कॉंग्रेसकडे राहणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यातच जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडणार आहे. त्यात नवनियुक्त जि.प.सदस्यांची ओळख व सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये गटनेते पदाचा उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे बोलल्या जाते. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे नोंदणी होईल. कॉंग्रेसकडून गट नेतेपदासाठी प्रकाश खापरे, अरुण हटवार, दूधराम सव्वालाखे, नाना कंभाले यांच्या नावाची चर्चा आहे. तर उपाध्यक्ष पदी मनोहर कुंभारे यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. परंतु काही सदस्यांकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे.
मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. नागपूर ग्रामीणच्या राजकारणावरील आपली पकड त्यांनी अधिक घट्ट केली आहे. या पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत होते. ग्रामीणमध्ये या नेत्यांच्या चांगल्या सभाही झाल्या. पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आत्मविश्वास कॉंग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये कामी येणार आहे. जिल्हा परिषदेवर पकड मिळविल्यानंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतही कॉंग्रेसला अशाच चमत्काराची अपेक्षा आहे.
विरोधी पक्ष नेतेपदी कारेमोरे?
विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांचेही ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सदस्यत्व रद्द झाले होते. पोट निवडणुकीत निधान पराभूत झाले. ज्येष्ठ सदस्य व्यंकट कारेमारे उपगट नेते आहेत. त्यांच्याकडेची जबाबदारी येणार असल्याचे बोलल्या जाते. कैलास बरबटे, आतिष उमरे, सुभाष गुजरकर यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी संभ्रमात
राष्ट्रवादीचे गट नेते चंद्रशेखर कोल्हे यांचेही सदस्यत्व रद्द झाले असून त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. माजी मंत्री अनिल देशमुखांवरील कारवाईमुळे त्यांचे पुत्र सलिल देशमुखही अडचणीत आले. त्यामुळे हे पद कुणाला द्यायचे, याबाबत संभ्रम आहे. मात्र दिनेश बंग यांच्याकडे ही जबाबदारी येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.