
Tanaji Sawant Defender Car Video : सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भीषण महापुरानं गावच्या गावं उद्ध्वस्त झाली. अनेकांची शेती पाण्यात बुडून गेली, शेतकऱ्यांचं घरदार व्यवसाय सर्वकाही पाण्यात बुडून गेलं. यामध्ये शेतकरी, मजूर, कामगार वर्गाचं अक्षरशः जीवनंच वाहून गेलं. धाराशीव जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातही महापूर इतका भीषण होता की, याचा फटका केवळ सर्वसाधारण शेतकऱ्यालाच बसला नाहीतर भूम-परांडा भागात राहणाऱ्या शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना देखील याचा फटका बसला. त्यांच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या दोन फॉर्च्युनर गाड्या पुराच्या पाण्यात निम्म्या बुडाल्याचे फोटोही व्हायरल झाले होते.
पण आता हेच तानाजी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांच्या कुटुंबियांनी लँड रोव्हर या बड्या कार कंपनीची डिफेंडर ही कार विकत घेतली आहे. या कारचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यावरुन आता तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका-टिप्पण्या सुरु झाल्या आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये पांढऱ्या रंगाची नवीकोरी डिफेंडर कार दिसते आहे. या कारला हार घातलेला असून तानाजी सावंत यांच्या घरातील मंडळी या कारची पुजा करताना दिसत आहेत. इथं उपस्थित अनेकांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भावही दिसत आहेत. पण या व्हिडिओमुळं तानाजी सावंत मात्र टीकेचे धनी झाले आहेत.
तानाजी सावंत यांच्या घरी आलेल्या डिफेंडर कार कोणत्या व्हेरियंटची आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण लँड रोव्हर कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, डिफेंडर ही प्रिमियम आणि स्पोर्ट्स कॅटेगिरीतली कार असून ती तब्बल १५ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत बेसिक ९८ लाख रुपये एक्स शोरुम पासून सुरु होते. ती शेवटी टॉप मॉडेलच्या डेफेंडरची किंमत २ कोटी ४२ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे ही कार पेट्रोल, माईल्ड हायब्रिड (इलेक्ट्रिक+डिझेल), डिझेल, माईल्ड हायब्रिड (इलेक्ट्रिक+पेट्रोल) आणि ऑटोमॅटिक अशा पाच प्रकारात उपलब्ध आहे. त्यानुसार या कारची किंमतही बदलत जाते.
त्यामुळं एकीकडं महापुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारकडून पुरेशी मदत मिळू शकलेली नसताना तानाजी सावंत यांनी पुराच्या पाण्यात आपल्या दोन फॉर्च्युनर कार बुडाल्यानं आणि पूर ओसरताच काही दिवसांतच या कार्सऐवजी थेट डिफेंडर कार घेतल्यानं लोक आता टीका करायला लागले आहेत. एकीकडं शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळो किंवा न मिळो पण सावंतांनी मात्र कार घेऊन आपल्या संपत्तीचं प्रदर्शन मांडलं जे किळसवाणं आहे असं आता सोशल मीडियावर लोक बोलू लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.