
Mumbai News : संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडविषयी मोठी माहिती समोर आली आहे. कराडलाच खंडणीसाठी धमकावण्यात आल्याचे आणि त्यानंतर जीवाच्या भीतीने त्याने खंडणीखोराला 15 लाख रुपये दिले होते. विशेष म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून हे पैसे दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
कराडला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मागील वर्षी जानेवारी महिन्यातच गुन्हाही दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबतचा एफआयआर सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यानुसार माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयात टाइप रायटरची नोकरी करणाऱ्या गणेश उगले याने ही फिर्याद दिली आहे. तो इतर कार्यालयीन कामही पाहतो. शिवराज बांगर हा 1 जानेवारी 2023 रोजी जगमित्र संपर्क कार्यालयात आला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
वाल्मिकअण्णा कराड यांना बोललो आणि त्यांनी मला 15 लाख रुपये देण्यात सांगितले आहेत, असे बांगर आपल्याला म्हणाल्याचे उगले याने फिर्यादीत नमूद केलेआहे. कराड यांना फोन करून आपण याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, बांगर मला वारंवार व समक्ष भेटून तसेच वॉट्सअपद्वारे कॉल करून धमकी देत होता. मला 15 लाख रुपये देत नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालून ठार मारीन, तुझी समाजामध्ये बदनामी करेन. मला माझ्या जिवाचा धोका नको आहे. त्यामुळे त्याला 15 लाख रुपये दे, असे कराड यांनी सांगितल्याचे उगले म्हटले आहे.
बांगरला पैसे दिल्याचे सीसीटीव्हीमध्ये असल्याचा दावाही उगलेने केला आहे. पैसे घेतल्यानंतर बांगरकडून धमकी दिली जात होती. त्यामुळे पोलिसांत फिर्याद दिल्याचे उगलेने म्हटले आहे. ही फिर्याद मागील वर्षी 2 जानेवारी 2024 रोजी परळी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
एफआयआर पोस्ट करताना दमानिया यांनी म्हटले आहे की, वाल्मिक कराड कडून 15 लाखाची खंडणी शिवराज बांगर यांनी वसुल केली होती, असा FIR बाहेर आला आहे. वारंवार समक्ष भेटून व व्हॉट्सअप कॉल वरून, “पैसे दे नाहीतर तुला मारून टाकिन” अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली आणि 15 लाख कराडच्या सांगण्यावरून, जगमित्रच्या लॉकर मधून देण्यात आले? कराडला कोणी धमकी देऊ शकत होतं, हे माझ्या बुद्धीला पटत नाही, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.