सुंदरराव सोळंके आणि गोपीनाथ मुंडे दोघेही बीड जिल्ह्यातील : घडविला हा इतिहास

शरद पवारयांच्या मुख्यंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये दिवंगत सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे जलसंधारण, पाटबंधारे, महसूल अशी महत्वाची खाती होती. तर, पहिल्या युती सरकारमध्ये दिवंगत गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याकडेही गृह हे महत्वाचे खाते होते.
gopinath munde-solanke
gopinath munde-solanke

बीड : राजकारण आणि बीड असे अलिखीत समिकरणच आहे. अनेक दिग्गजांनी आपल्या कतृत्वाने राज्यात स्वतंत्र ओळखही निर्माण केली आणि वर्षानुवर्षे जपलीही हे विशेष. दरम्यान, राज्याला दोन उपमुख्यमंत्री देणारा राज्यात एकमेव बीड जिल्हा आहे. एक दिवंगत सुंदरराव सोळंके तर दुसरे दिवंगत गोपीनाथराव मुंडे. 

हयातीत नसले तरी दिवंगत सोळंके व दिवंगत मुंडेंसह दिवंगत बापूसाहेब काळदाते, दिवंगत बाबूराव आडसकर, दिवंगत केशरबाई क्षीरसागर या बीड जिल्ह्यातील नेत्यांची त्यांच्या कतृत्व, वक्तृत्व, नेतृत्व गुणांमुळे आजही राज्यात ओळख आणि आठवण कायम आहे. 

बिनविरोध आमदार म्हणून निवड

मोहखेड (ता. धारुर) येथील सुंदरराव सोळंके यांनी हैद्राबाद संस्थानच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली आणि राजकीय आखाड्यात प्रवेश केला. त्यांची राजकीय कारकिर्द जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून १९६० च्या दशकात सुरु झाली. त्यांनी लोकल बोर्डाचे (जिल्हा परिषदेचे) अध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर त्यावेळी खुल्या असलेल्या केज मतदार संघातून त्यांनी १९६७ साली पहिली विधानसभेची निवडणुक लढविली आणि जिंकलीही. त्यानंतर केज मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांनी गेवराई मतदार संघातून निवडणुक लढविली. विशेष म्हणजे ते बिनविरोध गेवराईचे आमदार झाले. त्यानंतर माजलगाव मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर तिसऱ्या वेळी ते माजलगावमधूनही विजयी झाले. दरम्यान, दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा पहिल्यांदा मंत्री म्हणून समावेश झाला. त्यांच्याकडे जलसंधारण, पाटबंधारे, महसूल अशी महत्वाची खाती होती. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून शरद पवार हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात  सोळंके यांचा उपमुख्यमंत्री म्हणून समावेश झाला. इंदिरा गांधी या पुन्हा पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्यानंतर पवार यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर 1980 मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली.

माजलगाव धरणासाठी राजकीय बलिदान

शरद पवार यांनी समाजवादी काॅंग्रेसची स्थापना केली. सोळंके हे विरोधी इंदिरा काॅंग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिले. उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांचा १९८० च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून पराभव झाला. त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या एस. कॉंग्रेसकडून गोविंदराव डक उमेदवार होते. या निवडणुकीत डकांनी सोळंकेंचा 2600 मतांनी पराभव केला होता. सोळंके यांच्यामुळे माजलगाव येथील धरणाची निर्मिती झाली. या धरणाच्या जागेवरून काही समाज गट नाराज झाले होते. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला. पण बीड जिल्ह्याला पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपद मिळवून देणारे सुंदरराव सोळंके नेहमीच लक्षात राहतील. माजलगाव धरणही हे त्यांचे स्मृतिस्थळ आहे. सोळंके हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री ठरले. त्या आधी वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते. 

सुंदरराव सोळंके यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, तसेच राजकीय पदांच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून दिल्या. मोफत नोकरी देणारे, अशीच त्यांची ओळख होती.

गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व

कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या बळावर याच पदावर बसण्याचा मान दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनाही मिळाला. नाथरा (ता. परळी) येथील मुंडेही कायद्याचे पदवीधरच. त्यांची राजकीय सुरुवातही जिल्हा परिषद सदस्य अशीच झाली. त्यांनी पाच वेळा विधानसभा आणि दोन वेळा बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रात मंत्री अशी त्यांची कारकिर्द राहीली. संघटनेतही त्यांना राज्य आणि देशपातळीवरील महत्वाच्या पदांवर काम करता आले. पूर्वी परळी हा रेणापूर मतदारसंघाचा भाग होता. रेणापूरमधून प्रतिनिधित्व करणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे पुनर्रचनेतील परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत. 1995 मध्ये राज्यात प्रथम युतीचे सरकार आले आणि त्यात गोपीनाथराव मुंडे यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली. विशेष म्हणजे महत्वाचे असलेले गृहखातेही त्यांच्याकडेच होते. केंद्रात ग्रामविकास हे महत्वाचे खाते त्यांना मिळाले. मात्र, काहीच दिवसांत त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यापूर्वीही त्यांनी केंद्रात लोकलेखा समितीवर काम केले.

राज्यात नासिकराव तिरपुडे, सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. मात्र जो उपमुख्यमंत्री होतो तो राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असा आतापर्यंतचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळेच अनेक जण हे पद घेण्यास नाखूष असतात.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com