Aaditya Thackeray : आनंद दिघेंच्या जयंती दिवशीच आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा; म्हणाले...
Aaditya Thackeray on Aanand Dighe Birth Anniversary : ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी ओळख मिळविणार्या आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) उध्दव ठाकरे यांनी दिघेंच्या जयंतीच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याचा दौरा केला होता. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आलं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (दि.२७) ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे गटाकडूनही ठाकरेंना आव्हान देत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दिघेंच्य जयंतीनिमित्ताने ठाकरे गट व शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले असतानाच माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) एक टि्वट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी सहा महिन्यांपूर्वी ४० आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली होती. शिंदेंच्या या निर्णयाला ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून मोठं समर्थन मिळालं आहे. आता या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच गुरुवारी ( दि.२६) शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शिंदे यांच्यासह बाळासाहेबांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह दादा भुसे, गुलाबराव पाटील, प्रतापराव सरनाईक, शंभूराज देसाई असे विविध नेते दिघेंच्या स्मृतीस्थळाला देणार भेट देणार आहे. यावेळी शिंदे हे ठाकरेंवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.
याचवेळी दिघेंच्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरे यांनी एक महत्वपूर्ण टि्वट केलं आहे. या टि्वटद्वारे त्यांनी दिघेंना अभिवादन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी टि्वटमध्ये शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक 'धर्मवीर आनंद दिघे'जी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! असा आशय टि्वटमध्ये लिहिला आहे.
या टिे्वटमध्ये ठाकरेंनी आनंद दिघेंचा उल्लेख शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सच्चे शिवसैनिक करत एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
उध्दव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
सध्या राजकारणात विकृत आणि गलिच्छपणा सुरू असतानाही शिवसेना मात्र आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. अन्यायावर लाथ मारा, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. पण त्यासोबतच ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपल्याला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. अस्सल आणि निष्ठावंत शिवसैनिक या व्यासपीठावर आहेत आणि बाकीचे जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले गेले ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, मी ते सांगण्याची गरज नाही अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेंवर बोचरी टीका केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.