मुंबई : महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) फुटून भाजपसोबतच (BJP) सरकार उभारण्याच्या भूमिकेवरून न्यायालयात गेलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर गटाला चहूबाजूंनी 'रसद' पुरवून राजकीय घडामोडींचे केंद्र ठरलेल्या 'सागर' बंगल्यावर 'लगीनघाई' सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि बंडखोरांत आरोप-प्रत्यारोप, एकमेकांना ताकद दाखविणारे शक्तिप्रदर्शन आणि न्यायालयातील दावे-प्रतिदावे गाजत असतानाच भाजप नेते सोमवारी बैठकांत रमले होते. बंडखोर गटाला कायद्याच्या लढाईत तेवढ्याच क्षमतेची यंत्रणा पुरविल्यानंतर सरकार स्थापनेच्या अनुषंगाने व्यूहरचना आखण्यासाठी भाजप नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. (Devendra Fadnavis Latest Marathi News)
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार मंत्र्यांची संख्या ५० च्या घरात गेली आहे. त्यानंतर शिवसेना आणि बंडखोर गटात सर्वोच्च न्यायालयात लढाई रंगली. याच काळात या गटासोबत सत्तावाटपाच्या सूत्रावर चर्चा केलेल्या भाजपने आता काही पावले पुढे टाकण्यास सुरवात केल्याचे बोलले जात आहे. कायदेशीर आणि तांत्रिक बाबींत शिंदे गट फसणार नाही, या हिशेबाने केंद्र आणि राज्यातील भाजप नेत्यांनी आपली यंत्रणा कामाला लावली आहे. शिवसेना, बंडखोरांमधील तिढा लवकर कधीही सुटण्याची आशा धरून भाजपच्या गोटात वेगवान घडामोडी घडत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'सागर' बंगल्यावर सोमवारीही सकाळपासून नेत्यांची रीघ लागली होती.
फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्यात बैठका झाल्या आहेत. त्याआधी प्रदेश कार्यालयातही अनेक नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या. शिवसेना, बंडखोरांमध्ये घमासान सुरू असतानाही भाजप नेते मात्र, उघडपणे काही न बोलता बैठकांवर भर देत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या खेळींवर नजर ठेवत, शिंदे गटाला वेळी सावरून नव्या समीकरणांची तंतोतंत जुळणी करण्यात येत आहे. सध्या शिवसेना, बंडखोर आमदारांत सत्तेवरून वाद दिसत असला, तरीही त्यात भाजपने अद्यापही उघडपणे उडी घेतलेली नाही.
भाजपचे केंद्र आणि राज्यातील काही बडे नेते पडद्याआडून भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याचे सत्ताकेंद्र होऊ पाहणाऱ्या 'सागर' बंगल्यावर तूर्त 'लगीन घाई' सुरू आहे. बैठका, नेत्यांच्या गाठीभेटी, त्यातील चर्चेचा तपशील आणि नव्या हालचाली आणि संभाव्य परिणामांची माहिती आपल्या वर्तुळाबाहेर जाणार नाही, याची पुरेपूर काळजी भाजप नेतृत्व घेत आहे. माध्यमांशी बोलताना हे नेते मोजकेच तेही सावध बोलत असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.