
Mumbai masala market news : कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवल्याच्या आणि करचुकवेगिरी केल्याच्या घटना नवीन नाहीत. अशा गैरप्रकारांमुळे सरकारी तिजोरीत अपेक्षित रक्कम जमा होत नाही. सरकारी तिजोरीवरील खर्चाचा भार मात्र वाढत राहतो.
नुकत्याच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याने तब्बल 44 कोटी रुपयांचे आयात शुल्क (कस्टम ड्युटी) बुडविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी व्यापारी स्नेह ककडिया आणि त्याचे वडील दीपक ककडिया, या दोघांवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाई केली. याप्रकरणी 25 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई (Mumbai) बाजार समिती परिसरात सुक्या मेव्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने कोट्यवधींचा कर चुकवला. तापर्यंतचे हे सर्वात मोठे आयात शुल्क चुकवल्याची चर्चा होत आहे. ककडिया याने चिलीहून आयात करण्यात आलेल्या अक्रोडच्या बिलामध्ये फेरफार केली. आयात किंमत 2.70 डॉलर प्रति किलो असताना बिलामध्ये फक्त 1.50 डॉलर प्रति किलो दाखवून सरकारचे 100 टक्के मूलभूत आयात शुल्क चुकवल्याचे समजते. याच पद्धतीने दीपक ट्रेडिंग कंपनीमार्फत 3,610 मेट्रिक टन अक्रोड कमी किमतीत मागवण्यात आले. त्यात सुमारे 44 कोटींच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाने सांगितले.
घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार दीपक ककडिया फरार असून, मुलगा स्नेह ककडिया गुजरातच्या (Gujrat) सूरत विमानतळावरून देश सोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला तिथून अटक करण्यात आली. तपासादरम्यान दुबई येथील युरो सेव्हन जनरल ट्रेडिंग एलएलसी या कंपनीचा वापर करून बनावट बिल फिरवण्यात आल्याचे समोर आले आहे. शिवाय कामगारांच्या नावावर बनवलेल्या खोट्या कंपन्यांतर्गत व्यवहार करत फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने आरोपी स्नेह ककडियाच्या ई-मेल खात्यातून बनावट बिल्स, विमा कागदपत्रे आणि हवाला व्यवहाराचे डिजिटल पुरावे मिळवले आहेत. हे प्रकरण केवळ आयात शुल्क चोरीपर्यंत मर्यादित नसून, हवाला नेटवर्क, फॉरेन एक्स्चेंज उल्लंघन, मनी लॉन्ड्रिंगपर्यंत पोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबत एका सामाजिक संस्थेने अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) अधिकृत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार एपीएमसी मार्केटमध्ये ईडीकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुमारे 15 ते 20 व्यापारी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या रडारवर आहेत. या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूट असोसिएशनने स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.