Aditya Thackeray : मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची आज 'शिव संवाद' यात्रेनिमित्त शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या महाड मतदारसंघात सभा होती. या सभेमध्ये आदित्य काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. तसेच ते गोगावले यांचेही होती. त्यामुळे गोगावले यांनी आदित्य यांचे भाषण उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या बंगल्यात बसून ऐकले.
सामंत यांच्या बंगल्यावर अनेक आमदार उपस्थित होते. बंगल्यावर मोठी गर्दी होती. मात्र, हे सगळे बाजूला ठेऊन गोगावले यांनी एका ठिकाणी बसून लक्षपूर्वक आदित्य यांचे भाषण ऐकले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून गोगावले यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर पुण्यात सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यावेळी गोगावले यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत जशास तसे उत्तर देऊ, आमच्या गाड्यावर हल्ले केले तर तुमच्याही गाड्यांवर हल्ले होतील, असा इशारा दिला होता.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी महाडमध्ये बंडखोर आमदारांवर जोरदार टिका केली. यावेळी आदित्य म्हणाले, ऐवढे वर्ष ज्यांना संभाळले सर्व काही दिले तरी यांनी पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही गेलात तिथे आनंदात रहा, आमच्या मनात राग नाही द्वेष नाही. लोकांनी या पूर्वीही अशा उडया टाकलेल्या आहेत. मात्र, आतापर्यंत जे गेले आहेत, ते राजीनामे देऊन गेलेले आहे. पण या गद्दरांवर दडपण असेल जे काही केले ते भोगावे लागेल. बेडकासारख्या उड्या टाकून गेले. तुम्हालातीथे लख लाभ असो, असा टोला त्यांनी लगावला.
मात्र, तुम्हच्यात थोडी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा दया आणि निवडणुकीला सामोरे जा. होऊन जाऊ दे काय ते, असा इशाराही त्यांनी दिला. आज अनेक जण विधानभवनात भेटल्यावर लाजतात डोळ्यात डोळे घालून बघत नाहीत. पण आजही ज्यांना चूक लक्षात आली त्यांच्यासाठी 'मातोश्री'ची दार उघडी आहेत, असेही ते म्हणाले. यावर शिवसैनिकांनी गद्दाराना शमा नाही, अशा घोषणा दिल्या. महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण आम्ही केले, कोरोना काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कौतुक जगभरात झाले. कोरोना काळात सहा लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली.
महाविकास आघाडी सरकार असताना राज्यात जातीय दंगली झाल्या नाहीत. प्रत्येक धर्माला सोबत घेऊन जात होतो. हिंदु-मुस्लिम भेदभाव केला नाही. हेच यांच्या पोटात दु:खत होते, असा हल्लाबोल त्यांनी केला. याच बरोबर राज्यपालांनाही त्यांनी टोला लगावला. ते म्हणाले, पाच ते सहा राज्यपाल आम्ही पाहिलेत, अनेक प्रश्न आम्ही त्यांच्याकडे नेले होते. मात्र, राजकीय राज्यपाल आम्ही पहिल्यांदाच पाहिले. पहिल्यंदा राज्यपाल सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त बोलले. त्यानंतर त्यांनी मराठी अमराठी असा भेदभाव केला.
काश्मीरमध्ये पंडितांवर होणाऱ्या हल्याबाबत कुणी बोलत नाही. महागाईबाबत कुणी बोलत नाही, असेही ते म्हणाले. राजकीय नेत्यांना कणा असतो ते उद्धव ठाकरेंकडे पाहून कळाले. नाहीतर आता दिल्ली दरबारी अनेक जण सध्या झुकत आहेत, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता केली. उद्धव ठाकरे हे आजारी असतानाही आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असतानाही त्यांनी मला परदेशात पाठवले. मी परत आल्यावर दुसऱ्या शस्त्रक्रियेबाबत ऐकून धक्काच बसला. हे आजार पण मी जवळून पाहिले. त्यांची हालचाल कमी झाली होती. तरी फोन करून ते प्रत्येक कामाचा आढावा घेत होते, असेही आदित्य यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव त्यावेळी वाढत होता. त्याच वेळी ४० गद्दार मुख्यमंत्रीच्या खूर्चीवर डोळा ठेवून जमवा-जमव करत होते. ज्या मुख्यमंत्र्यांनी सर्व दिले, चांगली खाती दिली. आम्ही अडचणीत होतो तेव्हा तुम्ही राजकारण करत होतात पाठीत खंजीर खुपसत होतात, अशा शब्दांत आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तुम्ही आई-वडिल, गुरूस्थानी असलेल्यांच्या पाठीत खंजीर खुपसाल? यांनी पुढे येऊम महाराष्ट्रात फिरून लोकांना धीर द्यायला हवा होता पण हे सत्तेत रमले होते. या गद्दारीमुळे राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसते हे कळून चुकले, पण हे चित्र मी बदलायला निघालो आहे. यांनी छातीवर नाही पाटीत वार केलेत यांना लायकी पेक्षा जास्त दिले.
यांनी उठाव केला असे ते म्हणतात पण यांनी उठाव नाही तर गद्दारी केली आणि सूरतेला पळाले. हे खरे शिवसैनिक असते तर आसाममध्ये मजा मसती करत बसले नसते तर पुरात अडकलेल्यांना मदत केली असती. ट्रॅक पॅट आणि खांद्याला रुमाल लावून फिरले नसते, असे म्हणत त्यांनी भरत गोगावलेंना टोला लगावला. हे टेबलावर नाचणारे तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात का? हे आमदार तुम्हाला चालतील का? ठाकरेंना एकटे पाडण्याचा हा प्रयत्न आहे, शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मला एक सांगा आम्हाला संभाळून घ्याल ना? सोबत उभे रहाल ना? अशा प्रकारे आदित्य यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.