खार की सांताक्रूझ पोलीस ठाणे? नवनीत राणांचं पत्र अन् वकिलांच्या दाव्यानं पुन्हा ट्विस्ट

आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
MLA Ravi Rana, MP Navneet Rana
MLA Ravi Rana, MP Navneet RanaSarkarnama

मुंबई : आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला आहे. या संबंधी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांनाही पत्र लिहिलं आहे. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी बुधवारी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यात चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केला. पण काही तासांतच राणांचे वकील रिझवान मर्चंट यांनी राणांना दिलेली वागणूक सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील असल्याचा दावा केला आहे.

मर्चंट यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाला पुन्हा एका वेगळं वळण लागलं आहे. राणा यांच्या पत्रामध्ये स्पष्टपणे खार पोलीस ठाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर पांडे यांनीही त्यांच्या दाव्यानुसार खार पोलीस ठाण्यातील व्हिडीओ ट्विट केला. पण मर्चंट यांनी पांडे यांच्या व्हिडीओवरून प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर पलटवार केला आहे. मर्चंट यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला आहे.

MLA Ravi Rana, MP Navneet Rana
अखेर सत्य समोर! संजय पांडेंनी नवनीत राणांचा व्हिडीओ केला व्हायरल

मर्चंट यांनी सांगितलं की, नवनीत राणा यांनी केलेले आरोप हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील आहेत. त्यांना खार पोलीस ठाण्यात चहा देण्यात आला, हे खरं आहे. त्याचाच व्हिडीओ पांडे यांनी ट्विट केला आहे. पण राणांना मध्यरात्री एक वाजता सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं. तिथंच त्यांना अशी वागणूक देण्यात आली, असं मर्चंट यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विस्ट आला असून आता संजय पांडे याला कसं उत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, संजय पांडे यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले जात आहे. 'आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का,' असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पांडे यांनी यापेक्षा काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलीसांनी कोणतीही चूक केली नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. थेट संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले. पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे.

मुंबई पोलिस जातीयवादी असल्याचा आरोप राणा यांनी केला होता. त्याची लेखी तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. त्यातून त्यांचा 'दलित कार्ड'चा प्लॅन होता. मात्र, तो प्लॅन मुंबई पोलिस आयुक्तांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमुळे फेल झाला असल्याचे सांगितले जात आहे. नवनीत राणा यांचा पोलिसांविरोधात अँट्रासिटी केस दाखल करण्याचाही हेतू होता. मात्र, तक्रार नोंदवनारे आणि तक्रार नोंदवून घेणारे अधिकारी एकाच प्रवर्गातील आहेत. राणा यांच्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात चुकीच्या वागणुकीचा उल्लेख आहे. मात्र, त्यांना मध्य रात्री सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले होते. पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे आता राणाच अडचणीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com