Ncp Political Crisis : अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट व बेलगाम आरोप करण्यापूर्वी आपणही काचेच्या घरात राहतोय, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारू शकतो हे लक्षात ठेवा, असा इशारा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला. तसेच सूरज परमार आत्महत्या, अनंत करमुसे आणि वैभव कदम या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हानही परांजपे यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कर्जत येथे वैचारिक मंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात 2004, 2017, 2019, 22 जून 2022, 2 जुलै, 12 जुलै, 12 ऑगस्टपर्यंतच्या पक्षातील घटनांची सविस्तर माहिती देत राजकीय गौप्यस्फोटही केले. त्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत गंभीर आरोप केले. आव्हाड यांच्या आरोपांना आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार नेहमीच खरे बोलतात. त्यांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच आहे, असे म्हणत आनंद परांजपेंनी टोला लगावला.
सूरज परमार या विकसकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हणमंत जगदाळे यांना अटक झाली. त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात? तत्कालीन अतिरिक्त पोलिस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेला होतात? हे एकदा जाहीर करा. त्याचबरोबर अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण प्रकरणी 5 ऑगस्ट 2020 ला रात्री 8 वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करू नका. तरी आपल्या खूशमस्कऱ्यांचे ऐकून कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलिसांसमोरच अनंत करमुसे यांना बेदम मारहाण करून बालिशपणा दाखवला. या कृत्याने तुम्ही पोलिसांचे करिअर बर्बाद केलेत, याचे उत्तर द्यावे. तसेच अंगरक्षक वैभव कदमच्या आत्महत्येस व त्यांच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टीस जबाबदार कोण? याचे उत्तर द्या, असे आव्हान परांजपे यांनी दिले.
दरम्यान, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट व बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात राहत आहात. आपण एक दगड माराल, तर आम्ही दोन दगड मारू शकतो हे लक्षात ठेवा, असा इशाराही आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना या वेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.