Ajit Pawar MLA Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटाकडे नेमके किती आमदार आहेत, याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. अजित पवार यांच्या गटाकडे ४०, तर शरद पवार यांच्यागटाकडे १९ ते २० आमदार असल्याचे बोलले जाते.
दोन जुलैला राष्ट्रवादीत बंडाळी झाली. त्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. पण त्यानंतर आता पंधरा दिवसांनी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात टीका न करता सावधतेची भूमिका घेतली आहे.
आज (सोमवारी) सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदार, मंत्र्यांसह शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. पण पवारांनी कालप्रमाणे आजही काहीही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे अजित पवार गटाचे टेन्शन वाढलं आहे.
राष्ट्रवादीतील 'साहेब' आणि 'दादा' यांच्या समर्थक आमदारांच्या गाठीभेटीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या भेटीतून काय साध्य होणार, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर दोन्ही गटाकडे किती संख्याबळ आहे, याची माहिती विधीमंडळात द्यावी लागणार आहे. यामुळे दोन्ही गटाकडे राजकीय पेच निर्माण झाला आहे.
आजपासून १२ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट शरसंधान करणाऱ्या अजित पवार, छगन भुजबळ व प्रफुल्ल पटेल यांना गेल्या दोन दिवसांपासून पवार यांच्या आशीर्वादाची गरज का भासू लागली आहे. रविवारी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी आणि आज आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पवार यांच्या भेटीची आणि आशीर्वादाची गरज अचानक का वाटू लागली याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
"राष्ट्रवादी"चा "विठ्ठल" अजित पवार गटाला पावणार का?
अजित पवार गटाने पवारांशी संवाद साधून टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. विधीमंडळात अजित पवार गटावर कारवाई करण्याची वेळ आली तर शरद पवार गटाने कठोर पावलं उचलू नये, पवार गटाकडून कारवाईची धार कमी व्हावी, यासाठी अजित पवार गटाची ही धावाधाव सुरु आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी पवारांची भेट घेतली तेव्हा "विठ्ठला सांभाळ रे आम्हाला," अशी आर्त हाक त्यांनी पवारांना दिली होती. त्यानंतर "राष्ट्रवादी"चा "विठ्ठल" आता अजित पवार गटाला पावणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.