मुंबई : जनतेने निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ''लोकशाही पद्धतीने भारतामध्ये सर्वांना निवडून येण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जरी घराणेशाहीतला व्यक्ती असला तरी सुद्धा त्याची कुवत आणि क्षमता असेल, तो निवडून येत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राजकारणातील घराणेशाहीवर सडकून टीका केली. राजकारणातील घराणेशाहीमुळे गुणवत्तेवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला. मी जेव्हा काका-पुतण्याशाही, घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलतो असं वाटतं. पण अलीकडच्या काळात राजकारणातील या घराणेशाहीची लागण आता देशातील इतर संस्थांमध्ये झाल्याचे दिसत आहे. राजकारणाच्या बाहेरील घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान झाले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंंग्रेसच्या कार्यालयात अजित पावर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, भ्रष्टाचार हा कोणालाही नको आहे. पंतप्रधान असतील किंवा कुठलाही नागरिक असेल देशातला भ्रष्टाचार करणंच अयोग्य आहे.
सांस्कृतिक मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी वंदे मातरम बोलण्यासाठी घोषणा केली आहे. पण राज्यात उद्धव ठाकरे सरकार असताना त्यावेळेस 'जय महाराष्ट्र' हे फोन केल्यावर वापरले जायचं. आता नवीन सरकार आल्यानंतर आता 'वंदे मातरम' बोलले जात आहे. आम्ही सभागृहात विचारू की वंदे मातरम कशासाठी वापरले जात आहे, त्याचं कारण जर योग्य असेल तर त्याला विरोध करणार नाही. त्याच्या संदर्भात काही चांगलं केलं जात असेल तर त्यात काही गैर नाही. असंही अजित पवार यांनी म्हटलं.
महाराष्ट्र राज्याचा कुठल्याही खात्याचा मंत्री होऊनही महत्त्वाची गोष्ट ही आहे की वजनदार खाती तुमच्या भाषेत असतात. पण माझ्यासाठी सर्व खाता समसमान आहेत. जर एखाद्या माणसाची कुवतच नसेल आणि त्याला जर मलाईदार खातं मिळालं तरी ते खातच योग्य पद्धतीने चालणार नाही, असा टोलाही त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.
तसेच, जोपर्यंत त्यांच्याकडे 145 चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत हे सरकार राहिल. आमचं सरकार असताना सांगितलं जात होतं की 25 वर्षांचे हे सरकार राहील. कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी असं बोलावं लागतं, पण कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही, हे लक्षात ठेवावं. बहुमतातला एक आकडा जरी कमी झाला तरी सरकार कोसळू शकते, असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.