Amol Mitkari on Ajit Pawar Ambition : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. त्यांनी स्वतःच मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे वारंवार सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पक्षातील कुठलेही पद द्या, त्याला न्याय देईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ पाच वर्षे एक महिना झाल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)
खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी आपली इच्छा जाहीर केली. त्यामुळे आगामी विधानसभेत पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा त्यांचा इरादा आहे. यातून अजित पवार यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. दरम्यान, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारांने जाहीर केली आहे. ते मुख्यमंत्री होण्यासाठी आपण पांडुरंगाला साकडं घालणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी आषाढी वारीत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी दोन मागण्या केल्या आहेत. ते म्हणाले, "दरवर्षी पंढरीची वारी करतो. यावर्षी सहकुटुंब जगदगुरू तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी झालो आहे. सहाशे किलोमीटरहून पालखीसाठी आलो आहे. पालखीचे दर्शन घेतले. आताही पालखीसोबत पुढे चालणार आहे. दर्शन घेताना पांडुरंगचरणी, तुकोबारायांचरणी मागणी केली. सध्या राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. तो आर्थिक विवंचणेत आहे. या महाराष्ट्रातील धरणे भरू दे. सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र होऊदे. शेतकऱ्यांचे उत्पन्न चारपट होईल, एवढा पाऊस पडू दे. शेतकऱ्यांना भरभरून आशिर्वाद मिळू दे. हेच साकडं मी पांडुरंगचरणी मागणार आहे."
मिटकरी यांनी दुसरी मागणी अजित पवार मुख्यमंत्री होण्याची केली आहे. आगामी आषाढी पुजेचा मान अजितदादांना या मिळावा असे साकडं घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमोल मिटकरी म्हणाले, "सध्या राज्यात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहराशहरात जातीय दंगली होत आहेत. शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. तो सुटताना दिसत नाही. राज्यावरील ही ईडापीडा टाळायची असेल तर अजितदादा यांना भविष्यात आषाढी एकादशीचा पुढचा मान मिळावा. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. त्यांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम व्हावा."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.