
Mumbai : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले असतानाच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट सत्तेत सामील झाला. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन आधीच नाराज असलेल्या शिंदे गटाच्या अडचणी पुन्हा वाढल्या. त्यात मंत्रिपदासह पालकमंत्रीपदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीत धूसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात 'कोल्डवॉर' सुरू असल्याची चर्चा आहे.
अशातच आजारपणाचे कारण देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच दूर केले जाईल, अशा चर्चा काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्य मंत्रिमंडळातील नाराजी दूर करण्यासाठी मोठे पाऊल उचलत स्नेहभोजनाचा बेत ठरवला. पण या सरकारी स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि त्याच्या पत्नी लता शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनासाठी बोलावले होते. वांद्रे येथील ताज लॅन्डस् एन्ड या हॉटेलमध्ये गुरूवारी संध्याकाळी 7 वाजता हे स्नेहभोजन देण्यात आले आहे. मात्र, या स्नेहभोजनासाठी अजित पवार गट मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसाठी आयोजित केलेले हे पहिलेच स्नेहभोजन होते. यावेळी मुख्यमंत्री मंत्र्यांसोबत बैठकही घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या स्नेहभोजनाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले होते.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) व इतर मंत्री वांद्रे येथे स्नेहभोजनासाठी दाखल झाले आहेत. तर अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा नाराजीची चर्चा जोर धरू लागली आहे. अजितदादा मुंबईत असताना ही न गेल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. निमंत्रणाच्या एकतास विलंबानंतरही अजित पवार देवगिरी निवासस्थानीच असल्याचे समोर येत आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच धुसफुस मिटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिंदेंनी आपल्या मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचा बेत ठरवला. यातून मंत्री आणि आमदारांमध्ये सुरु असलेली मंत्रिमंडळ विस्तार, मतदारसंघ आणि उमेदवारीची धूसफूस शांत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलेले नाही. याबाबत स्वत: आमदार बच्चू कडू यांनी माहिती दिली होती. ते म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र, आपल्याला त्या स्नेहभोजनाचे निमंत्रण नसल्याने आपण त्याला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
अजित पवार- शिंदेंमध्ये कोल्डवॉर ?
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी अचानक वॉर रूमची बैठक घेत प्रकल्पांचा आढावा घेतला. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवरच हे अतिक्रमण असल्याची चर्चा राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळातही सुरू आहे. त्यामुळेही शिंदेही नाराज असल्याचं बोलले जात आहे. या कारणामुळेच एकनाथ शिंदे आजारपणाचे कारण देऊन आपल्या सातारा येथील दरेगावी गेल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे स्नेहभोजनाला अजित पवारांनी मारलेल्या दांडीमागे पुन्हा कोल्डवॉरची चर्चा रंगली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.