Mumbai News, 06 Aug : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्याकडे असलेले अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले. अजितदादांकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आला.
तर उपमुख्यमंत्रिपदाप्रमाणेच अजित पवार यांच्याकडील अर्थ खाते देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं तरीही अद्याप हे खातं राष्ट्रवादीला देण्यात आलेलं नाही.
यावरून राज्याच्या राजकारणात सतत चर्चा होत असते. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी अर्थखात्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. मिटकरी यांनी एक्सवर सुनेत्रा पवारांचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी अर्थ खाते राष्ट्रवादीकडे सोपवण्याची मागणी केली आहे.
अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "महायुती सरकार स्थापन होताना राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय अजितदादांकडे अर्थ खात्याची धुरा सोपविली होती आणि आदरणीय दादांनी सुद्धा ती समर्थपणे पेलली. मात्र दादानंतर आदरणीय सुनेत्रा वहिनीकडे ही जबाबदारी अर्थसंकल्प मांडल्यावर देण्याची भावना मुख्यमंत्र्यांनी जाहीर बोलून दाखविली होती व तसा त्या खात्यावर हक्कही राष्ट्रवादीचाच.
राज्यभरातील लाखो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही आपल्या वचनपुर्तीची अपेक्षेने वाट पाहत आहेत. अजितदादांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात मात्र प्रचंड वेदना आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महायुती मजबूत करण्यासाठी सातत्याने जबाबदारीने साथ दिली आहे.
त्यामुळे दिलेला शब्द पाळला जाणे ही केवळ राजकीय बाब नसून विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर सन्मानाची बाब आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्र विनंती आहे की, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करून अर्थखाते पक्षाकडे सोपवावे. जेणेकरून महायुतीतील विश्वास अधिक दृढ होऊन कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल," असं म्हणत त्यांनी अर्थखाते राष्ट्रवादीकडे देण्याची विनंती केली आहे.
तर याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनीही पक्षाच्या स्वाभिमानासाठी कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत ठामपणे पोहोचविण्यात पुढाकार घ्यावा, असा सल्ला दिला आहे. शिवाय दिलेला शब्द पाळला जावा, एवढीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. शब्दाला किंमत असते. तो पाळला गेला तर विश्वास वाढतो; आणि विश्वास टिकला तरच युती अधिक मजबूत होते. आपल्या निर्णयाकडे तमाम राज्याचे लक्ष लागून आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना अर्थखात्याबाबतचा शब्द पूर्ण करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मिटकरींच्या या ट्विटनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.