Maharashtra News : लोकसभा निवडणुतील निराशाजनक कामगिरीनंतर महायुतीत खटक्यावर खटके उडू लागले आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांनी महायुतीतलं राजकारण तापलं आहे. त्यात शिंदे - फडणवीस सरकारमध्ये नंतर सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबाबत उघड-उघड नाराजी बोलून दाखवली जात आहेत.
अशातच अजित पवार गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी गेल्या काही दिवसांत रोखठोक आणि महायुतीतली शांतता भंग करणारी विधानं करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी स्वबळाची देखील भाषा सुरू केली आहे. यावरुनच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. आता मिटकरी यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपला (BJP) कडक इशारा दिला आहे.
विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यात त्यांनी महायुतीतील मित्रपक्षांना खडेबोल सुनावतानाच भाजपच्या दरेकरांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी म्हणाले, प्रवीण दरेकर यांनी आमची लायकी काढली तर आम्ही शांत बसणार नाही. ते म्हणतात आमची क्षमता नाही,बरोबर आहे त्यांचं...माझी क्षमता नाही. कारण माझ्याकडे बँका नाहीत,मी काही चेअरमन नाही,ना माझ्याकडे कुठलं घबाड आहे.पण भाजपच्या काही वाचाळवीरांनी शांत बसावं अन्यथा आम्ही त्यांची लायकी काढू...मग महायुतीत मिठाचा खडा पडला तरी चालेल असा इशाराही मिटकरींनी यावेळी दिला.
तसेच अजितदादा यांनी मला उद्या भेटायला बोलावलं आहे...मी उद्या भेटून विचारणार आहे की मी बोलायचं की नाही असं विचारणा करणार असल्याचेही मिटकरी यांनी सांगितले आहे.
याचवेळी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय परंपरा पाळत विरोधकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी पाटील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले. तिथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि अनिल परब दोघेही उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना पाहताच आश्चर्य व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील हे भलं मोठं चॉकलेट घेऊन अंबादास दानवेंच्या भेटीला आले होते.यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही एकत्र आल्यावर चॉकलेट दिले पाहिजे फक्त गाजर देऊ नका. त्यांच्या चॉकलेटचा कोणता ब्रँड आहे ते सांगा, आम्ही ते देऊ असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.
महाविकास आघाडी आणि महायुतीतील प्रत्येक पक्षाने 100 जागा लढवाव्यात असं ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल असं विधान करणा अमोल मिटकरींवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तोंडसुख घेतले होते. ते म्हणाले, अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. मिटकरी यांना अधिकार दिला आहे का? हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यानं जाहीर करावं. जेणेकरून त्यांनी घेतलेली भूमिका ही अधिकृत असल्याचे समजू असं म्हणत दरेकरांनी मिटकरींना डिवचलं आहे.
याचवेळी त्यांनी अमोल मिटकरी यांच्या बोलण्याला महत्त्व द्यावं, असं मला बिल्कुल वाटत नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा त्याला महत्त्व येणार आहे. अमोल मिटकरींचं बोलणं म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं यापलिकडे दुसरा पर्याय नाही असा हल्लाबोल त्यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.