जुई जाधव-
Maharashtra Politics Latest News : मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सेविका गेल्या 40 वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत आहेत. आज सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका आंदोलनासाठी बसल्या आहेत. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथेच बसून राहू, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आझाद मैदानावर राज्यातील विविध भागांतून महिला दाखल झाल्या आहेत. काही महिला विधवा आहेत, तर काही महिलांचं घर त्यांच्यावर चालतं. अशा सेविकाही यात सहभागी आहेत आणि योग्य ती मदत वेळेवर मिळावी, ही त्यांची मागणी आहे.
गेल्या 40 वर्षांपासून अंगणवाडी सेविका त्यांच्या मुख्य 4 मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत.
काय आहेत प्रमुख मागण्या?
1. सर्वोच्च न्यायालयाच्या civil appeal no. 3153 of @slp (civil) no. 30193 of 2017 मधील 25 एप्रिल रोजी ग्रॅच्युइटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी.
2. अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दर महिना 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये मानधन द्यावं.
ज्या जुन्या सेविका आहेत त्यांना 10,500 रुपये पगार आहे आणि ज्या नवीन रुजू झालेल्या सेविका आहेत त्यांना 10,000 पगार आहे.
3. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा
4. मानधन नको तर वेतन हवं, यासोबत पेन्शनही लागू झाली पाहिजे
अशा काही प्रमुख मागण्या आहेत. यासाठी सर्व कर्मचारी आंदोलनासाठी बसले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारवर नाराजी
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना या सगळ्या महिला थंडीत आंदोलनासाठी बसल्या होत्या. त्यावेळेला महिला बालविकास विभागाने साधी विचारपूसही केली नाही. पण मंत्री अदिती तटकरे यांनी हा मोर्चा कशासाठी होत आहे? असा प्रश्न विचारला. यावरून या सगळ्या महिलांमध्ये रोष दिसून येत आहे.
सरकार कुठलीही येऊ देत, पण या सेविकांकडे कायम दुर्लक्ष केलं जातं, असा रोष या महिलांचा सरकारवर आहे. ज्यांची सत्ता येते ते फक्त येऊन भेटतात आणि आश्वासन देऊन जातात. खरी परिस्थिती भेटून कोणीही पाहत नाही आणि मागण्या मान्यही करीत नाही, असा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे.
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार येऊन गेलं. पण या सेविकांकडे कोणीही लक्ष देत नाही. केवळ आश्वासनं दिली जातात. मागण्या मान्य केल्या जात नाहीत.
जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करीत राहणार. आश्वासन पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार, असा निर्धार या महिलांनी केला आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.