मुंबई : भारतीय जनता पक्षाने जम बसविलेल्या राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यांतील निवडणुकांत जोरदार 'बॅटिंग' करीत, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आपल्या मंत्रिपदाच्या 'डच्चू'चा चेंडू टोलावून लावला आहे. या निवडणुकांतील यशाने केदारांचे स्थान काँग्रेस आणि सरकारमध्येही बळकट झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये फेरबदल करताना सुनील केदार यांचे मंत्रिपद जाऊ शकते, याचा अंदाज बांधला जात होता, तो आता फेल ठरणार असं दिसतंय.
विदर्भातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांनिमित्त ठाकरे सरकार आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले होते. राज्यातील सत्तासंघर्षातून विदर्भात काँग्रेस, भाजपच्या नेत्यांनी या निवडणुकांना प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यात फडणवीस यांच्यापासून भाजपचे माजी मंत्री तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केदार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत या मंडळींनी आपली राजकीय पत वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यात केदार यांच्या सावनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचा पूर्णपणे पाडाव झाला असून, महाविकास आघाडीने सर्वच सहा जागांवर वर्चस्व निर्माण केले आहे. केदारांच्या खेळीपुढे भाजपचा एकही खेळाडू टिकला नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची ताकद तर वाढलीच पण केदारांच्या मनगटातही बळ आले आहे.
काँग्रेसमध्ये आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, केदार आणि राऊत यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाण्याची चर्चा होती. त्यात कोरोना काळात फारसे काम केले नसल्याचा दाखला देत, केदार यांचे मंत्रिपद अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. तेव्हा केदार हे अस्थिर असल्याचीही चर्चा होती. परंतु, या चर्चेला केदार यांनी भाजपला धोबीपछाड देत, विदर्भातील जनता आपल्या पाठीशी असल्याचेही दाखवून दिले. ज्या भाजपला विदर्भात पाय पसरायचे होते; काही प्रमाणात ते पसरले गेलेही होते, त्यात विधानसभा निवडणुकीपासून धक्के बसले. त्यानंतर महाविकास आघाडीने प्रामुख्याने काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भात भाजपला संपविण्याचा विडाच उचलला आहे. ज्यात शिवसेना, राष्ट्रवादीची त्यांना साथ आहे.
या निवडणुका लढताना केदार यांनी आपल्याच खाद्यांवर सारी जबाबदारी घेतली; ती पूर्ण करून दाखविली आणि या जबाबदारीतून काँग्रेसमधील आपल्या विरोधकांना सडेतोड उत्तरही दिले. त्यामुळे केदार यांच्या पदाला धोका न होण्याचा निकाल त्याच्या मतदारसंघातील लोकांनी दिला आहे. सुनील केदार यांच्यासह पाडवी आणि राऊत यांना बाजूला करून काँग्रेसच्या अन्य आमदाराला मंत्री करण्याचा श्रेष्ठींचा डाव आहे. त्यात पटोले, संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये जनमत वाढविणाऱ्या नेत्यांना सामावून घेत, त्यांनाच महत्त्वाच्या पदावर मान देण्याचे धोरण हायकमांडने घेतले आहे, त्यामुळे फडणवीस, गडकरींच्या भागांतच त्यांच्या भाजपला रोखल्याने केदार यांना तूर्तास काँग्रेसमध्ये धोका नसेल, असे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.