Bhiwandi Loksabha : राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीसाठी राज ठाकरे जाहीर सभा घेतील, अशीदेखील चर्चा आहे. राज ठाकरे यांची भिवंडी मतदारसंघात ताकद आहे. मनसेचा हक्काचा मतदार या मतदारसंघात आहेत. एक ते सव्वा लाख मतदार मनसेचे या मतदारसंघात असल्याने महायुतीला त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
कपिल पाटलांनी राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याकडून प्रचाराची रणनीतीविषयी चर्चा केली आहे. विरोधकांना तगडे आव्हान देण्यासाठी पाटील यांनी मनसे अध्यक्षांना साद घालत आपल्या प्रचारातही त्यांचा पाठिंबा मिळावा, याविषयी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या भेटीवेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि डी. के. म्हात्रे या वेळी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपने मनसेला मानाचे स्थान दिले आहे. जाहीर सभांच्या भाजपच्या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार राजू पाटील यांचे फोटो झळकत आहेत. तसेच मनसेचे झेंडेदेखील लागले. आमदार राजू पाटील व खासदार कपिल पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. खासदार पाटील यांना केंद्रीय पंचायत राज मंत्रिपद मिळाले. त्यावेळी भाजपच्या वतीने त्यांनी शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती. या वेळी कल्याण ग्रामीणमध्ये आमदार राजू पाटलांनी कपिल पाटील यांचे जंगी स्वागत केले होते.
कल्याण व भिवंडी मतदारसंघात मनसेचे मताधिक्य असून, या मतांचा पाठिंबा आपल्याला मिळावा यासाठी आता कपिल पाटलांनी राज यांची भेट घेतली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी राज यांचे आभार मानले, तर राज यांनी पाटलांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या रणनीतीबद्दल सूचना केल्या आहेत. आता राज यांच्या रणनीतीचा अवलंब करत पाटील विरोधकांना निवडणूकीच्या रिंगणात कसे तगडे आव्हान देतात हे पाहावे लागेल.
(Edited By Roshan More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.