Kalyan-Dombivli politics : भाजप-शिंदे गटाच्या वादात पोलिस निरिक्षक बागडेंचे सॅण्डविच; भाजपने केली ईडी, सीबीआयच्या चौकशीची मागणी
Kalyan-Dombivli News : कल्याणमध्ये भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. जोशी यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा, आरोप करत भाजपने मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी केली.
बागडे यांची बदली न होता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने भाजपचा रोष वाढला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आता थेट बागडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला आहे. इतकी संपत्ती एका वरिष्ठ पोलिस निरिक्षकाकडे कोठून आली? असा सवाल पत्रकार परिषदेत करत चौकशीची मागणी केली आहे. ही मालमत्ता त्यांनी कशी जमवली यासाठी ईडी, सीबीआय संबंधित खात्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याविषयीची कागदपत्र देखील सादर करणार असल्याचे प्रदेश सचिव गुलाबराव करुंजुले यांनी सांगितले.
भाजपच्या (BJP) वतीने रविवारी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर राहुल दामले, नंदू परब यांच्यास पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने शेखर बागडे यांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला आहे. या मालमत्तेची कागदपत्रे ईडी, सीबीआय संबंधित विभागाकडे पाठविली जाणार असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
पोलिस निरिक्षकाकडे एवढी मालमत्ता कशी येते याची माहिती मिळाली पाहीजे. या मालमत्ते संदर्भात ईडी (ED), सीबीआयची (CBI) चौकशी झाली पाहीजे, अशी आमची मागणी आहे. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांना अयोग्य वागणूक देत नाहीत. याविषयी वारंवार पोलिस खात्याच्या वरिष्ठांकडे तक्रार केली. तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे करंजुले यांनी सांगितले.
कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजप आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गट यांच्यातील वाद काही शमण्याचे नाव घेत नाही. राजकीय वरदहस्तामुळे भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बागडे यांच्या बदलीची मागणी केली. त्यांची बदली होत नसल्याने कल्याण येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आक्रमक होत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली.
बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचे तसेच शिंदे गटास सहकार्य न करण्याचा ठराव मांडला. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कमालीचे नाराज झाले असून त्यांनी भाजप शिवसेना युतीसाठी खासदार पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद शमेल असे वाटत असतानाच ठाणे येथे पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात आमदार संजय केळकर यांनी ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघ हे आपले होते, यापुढेही राहतील असे म्हणत स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भावना बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.