शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मदत सहकार्य केले नसल्याच्या तक्रारीचा पाढाच गुरूवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेत्यांनी वाचून दाखवला होता. त्यामुळे भाजप विधानसभेला स्वबळावर लढणार का? की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'कात्रज'चा घाट दाखवून भाजप-शिंदे सेना एकत्र लढणार? अशी चर्चा रंगली होती.
पण, स्बवळावर लढण्याचा विचार करू नका. शिंदे सेना आणि अजित पवार गटाला सोबत घेऊनच आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असा स्पष्ट आदेश भाजपच्या केंद्रीय प्रभारींनी कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील नेत्यांना शुक्रवारी दिला.
प्रभारींनी थेट आदेश दिल्यानं अजित पवार ( Ajit Pawar ) यांना बाजूला सारून शिंदेंची सेना आणि भाजप एकत्र लढतील, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात गुरूवारी आणि शुक्रवारी विस्तारित कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राबाबत असलेली पक्षश्रेष्ठींची भूमिका समजून सांगितली.
अजितदादा आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना सोबत घेऊन जाण्याची आपली 'कमिटमेंट' आहे. ती आपल्याला पूर्ण करायची आहे. पक्षनेतृत्वाचीही तीच भूमिका आहे. जागावाटपाचा फॉर्म्यूला एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना विश्वासात घेऊनच ठरविण्यात येईल, असं भूपेंद्र यादव यांनी म्हटलं.
त्यासह शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मदत केली नसल्याची तक्रार काही जिल्ह्यांच्या उदाहरणांसह भाजप नेत्यांनी प्रभारींसमोर तक्रारींचा पाढाच वाचला होता. मात्र, जिथे अशा तक्रार आहेत, त्याठिकाणाची परिस्थिती बदलता येईल. याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असं भूपेंद्र यादव यांनी सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलं.
'त्या' आमदारांचं तिकीट कापणार?
लोकसभा निवडणुकीत काम न केलेल्या किंवा ज्या मतदासंघात पुरेसे मताधिक्य मिळालेले नाही, अशा आमदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचा भाजपचा विचार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.