Chandrakant Patil: शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेमागे भारतीय जनता पार्टीचे (BJP) कोणतेही नियोजन नाही. शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) स्थैर्याबाबत भाजपाचे सध्या‘वेट अँड वॉच’चे धोरण आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज (ता.21 जून) केले. ते मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, कृपाशंकरसिंह, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, उत्तर भारतीय मोर्चाचे संयोजक संजय पांडे व प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते. (Chandrakant patil Latest Marathi News)
चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत आताच मत व्यक्त करणं घाईचे ठरेल. ते शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते आहेत. त्यांची भूमिका व त्यातून निर्माण झालेली परिस्थिती ही त्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. भाजपाने शिंदे यांना सत्तास्थापनेचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा त्यांच्याकडूनही कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे पाटलांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली व महाविकास आघाडीमार्फत सत्ता मिळवली. पण ही अनैसर्गिक युती असल्याने त्यामध्ये शिवसेनेच्या खासदार व आमदारांची घुसमट होत आहे. आगामी निवडणूक आपण भाजपासोबत युतीशिवाय जिंकू शकत नाही, असे अनेकांना वाटते. त्यातून पक्षाच्या नेत्यांची खदखद बाहेर पडणे स्वाभाविक असल्याच मत त्यांनी व्यक्त केलं.
भारतीय जनता पार्टीचे सर्व पाच उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. त्यापूर्वी १० जून रोजी राज्यसभा निवडणुकीतही भाजपाचे सर्व तीन उमेदवार विजयी झाले. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल रणनितीमुळे भाजपाला विजय मिळाला. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाचा राज्याला पुन्हा एकदा अनुभव आला. आपण प्रदेश भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने फडणवीसांचे अभिनंदनही पाटील यांनी केले.
दरम्यान, अन्य पक्षातील आमदारांनी सद्सदविवेक बुद्धीला स्मरून भाजपाला मतदान केले असून त्यांच्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये विजय संभव झाला. त्यांचे आपण आभार मानतो. महाविकास आघाडीच्या आमदारांमधील खदखद आणि असंतोष किती आहे याची या निवडणुकीच्या निमित्ताने चाचणी झाली. भाजपाला या निवडणुकांमध्ये आपल्या ११२ या संख्याबळापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे १३४ मते मिळाल्याचेही पाटलांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.