मुंबई : क्रुझवरील ड्रग पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) मुलगा आर्यनला (Aryan Khan) अटक करणारे अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Samer Wankhede) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका करत महाराष्ट्रात पोलिस-पोलिस खेळ सुरु आहे का, असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की ''तक्रारदारावरच पोलीसांनी गुन्हे दाखल करायचे. अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्याला पोलिसांकडूनच धमक्या. माजी गृहमंत्री, माजी आयुक्तांच्या पोलिस अजूनही मागावरच आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलीसांकडून पाठलाग. महाराष्ट्रात काय "पोलीस-पोलीस" खेळ सुरु आहे का?'' असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
वानखेडे यांच्या नेतृत्वाखाळी एनसीबीने क्रुझवर छापा टाकत आर्यनसह काही जणांना अटक केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. शाहरूख खान व बॉलीवू़डला लक्ष्य करण्यासाठी आर्यनला अटक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच भाजप व एनसीबीने कटकारस्थान करून ही कारवाई केल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे. वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हा मुद्दा चर्चेत असतानाच वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. वानखेडे हे आईवर अंत्यसंस्कार केलेल्या स्मशानभूमीत नेहमी जातात. तिथेच पाळत ठेवली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना काही पुरावेही सादर केले आहेत. पोलिसांनी स्मशानभूमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याचे समजते. ही पाळत नेमकी कुणाकडून व कशासाठी ठेवली जात आहे, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.