नवी दिल्ली : शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मागील आठवड्यात सपत्निक भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीमागील नेमका उद्देश समोर आलेला नसला भेटीनंतर सहाव्याच दिवशी झुनझुनवाला यांनी मोठी घोषणा केली आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वत: झुनझुनवाला यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला होता. या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. एकमेवाद्वितीय राकेश झुनझुनवाला यांना भेटून अतिशय आनंद झाला. भारताबद्दल त्यांनी अतिशय महत्वपूर्ण आणि सकारात्मक माहिती दिली, असे मोदींनी म्हटले आहे. या भेटीचा नेमका उद्देश समोर आलेला नाही. परंतु, या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मोदी हे झुनझुनवाला यांच्यासमोर हात बांधून उभे दिसत आहेत.
या भेटीनंतर सहाव्याच दिवशी झुनझुनवाला यांनी 'अकासा एअर' या नागरी विमान वाहतूक कंपनीची घोषणा केली आहे. या कंपनीला वाहतुकीसाठी केंद्र सरकारकडून सोमवारी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. या कंपनीचे पहिले विमान पुढील वर्षी उड्डाण करण्याची शक्यता आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडे अकासा एअरकडून परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. या परवानगीनंतर कंपनीने पहिला टप्पा पार केला आहे.
जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांच्याकडे अकासा एअरची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रस्तावित एअरलाईन्सच्या व्यवस्थापन मंडळावर झुनझुनवाला यांचे प्रतिनिधित्व इंडिगोचे माजी प्रमुख आदित्य घोष करतील. विमान खरेदीसाठी अकासाकडून बोईंग व एयरबस यांच्याशी चर्चा केली जात आहे.
दरम्यान, मोदी आणि झुनझुनवाला यांच्या भेटीच्या फोटोवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या होत्या. एका व्यापाऱ्यासमोर मोदी हात बांधून उभे आहेत, अशी टीका काहींनी केली आहे. तर काहींनी झुनझुनवाला यांच्यासारखे बना, म्हणजे पंतप्रधान तुमच्यासोबत फोटो काढून शेअर करतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.