BJP Muraji Patel Latest Marathi News
BJP Muraji Patel Latest Marathi NewsSarkarnama

विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजप शिवसेनेला देणार टक्कर; मुरजी पटेलांचं नाव आघाडीवर

मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा लवकरच होऊ शकते.

मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या 20 तारखेला मतदान होणार असून पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरूध्द भाजप असा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. पण ही चुरस इथेच थांबणार नाही, असं दिसतंय. पुढील काही दिवसांत मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार आहे. त्यासाठीही भाजपने तयारी सुरू केल्याचे समजते. (BJP Latest Marathi News)

अंधेरी पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार रमेश लटके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक (Assembly Election) लागणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत भाजप पूर्ण क्षमतेने उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार आशिष शेलार यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

BJP Muraji Patel Latest Marathi News
भाजपला एकच गोष्ट विजय मिळवून देऊ शकते! नेत्यांचा जोर त्यावरच...

मागील निवडणूक या मतदारसंघात शिवसेनेचे रमेश लटके हे 16 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. लटके यांना 62 हजारांहून अधिक मतं मिळाली होती. तर अपक्ष म्हणून लढलेले मुरजी पटेल हे दुसऱ्या स्थानावर होते. आता पटेल यांनाच उमेदवारी देण्याबाबत भाजपच्या स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

पटेल हे मुळचे काँग्रेसचे आहेत. 2012 मध्ये त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पती-पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 च्या निवडणुकीत दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले. तर 2018 मध्ये खोट्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं.

BJP Muraji Patel Latest Marathi News
काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि मॉब लिंचिंग...! सुपरस्टार साई पल्लवीनं आगीत तेल ओतलं

2019 च्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती होती. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याने तिथून रमेश लटके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या पटेलांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. त्यांनी 45 हजारांहून अधिक मतं मिळवत शिवसेनेला जोरदार टक्कर दिली.

2014 व 2019 मध्ये मोदी लाटेतही या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपकडून पटेलांना मैदानात उतरवले जाऊ शकते. पटेल हे फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्वाची मानली जात असल्याने भाजपसह शिवसेनाही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com