Bhaskar Jadhav : गेल्या काही दिवसापासून कोकणातील शिवसेनेचे नेते व गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे नेते यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. खालच्या पातळीवर एकमेंकावर टीका केली जात आहे. टीका करताना पातळी सोडली जात असल्याने नेत्यांविषयी सामान्य जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.
भाजपासह शिंदे गटाकडून वारंवार भास्कर जाधव यांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्तांतरानंतर भास्कर जाधव यांनाच का टार्गेट केलं जातंय असा प्रश्न सध्या राजकीय गोटात विचारला जात आहे.
गुलाबराव जाधव, रामदास कदम हे आक्रमक नेते शिंदे गटात गेले आहेत, तर ठाकरेंचे मुलुखमैदान तोफ खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात कारागृहात आहेत. कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते रामदास कदम हेच शिंदे गटात सहभागी झाल्याने कोकणात ठाकरे गटाच्या शिवसेनेत आमदार भास्कर जाधव हे एकमेव आक्रमक नेते शिल्लक राहिले होते.
भाजपासह शिंदे गटावर बेधडक टीका करण्यात आमदार भास्कर जाधव यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेतला. विधीमंडळ सभागृह असो की अन्य ठिकाणी शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून भास्कर जाधव यांची ओळख आहे.
कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला आमदार भास्कर जाधव यांच्या रुपात एक आक्रमक नेता यामुळे आता मिळाला आहे. कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला कमकुवत करायचा असेल तर आमदार भास्कर जाधव यानांच टार्गेट करावे लागेल हे समीकरण स्पष्ट आहे.
ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्याला गेल्या काही वर्षांत खिंडार पडायला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले आमदार उदय सामंत आणि शिवसेनेची तोफ समजले जाणारे शिवसेना नेते रामदास कदम व त्यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांचा शिंदे गटात झालेला सहभाग लक्षात घेता सिंधुदुर्ग पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यात देखील शिवसेनेला कोणीच वाली शिल्लक राहिलेला नाही. पण अशा परिस्थितीत राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतलेले आमदार भास्कर जाधव यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही.
उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार प्राप्त भास्कर जाधव यांनी आपल्या आक्रमक शैलीतून विरोधकांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रत्येक भाषणातून, प्रत्येक सभेतून त्यांनी सत्तांतरच्या नाट्यावर बेधडक टीका केली. या टीकेचे पडसाद म्हणूनच आज आमदार भास्कर जाधव यांना टार्गेट केले जात असल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.