मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला सुमारे दोन वर्षे झाली आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सीबीआयने या तपासाबद्दल मौन धारण केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातच आता माहिती अधिकारांतर्गत (RTI) या प्रकरणी मागिवलेली माहिती देण्यासही नकार देत सीबीआयने वेगळेच कारण समोर केले आहे.
सुशांतच्या मृत्यूबाबत सीबीआयने केलेला तपास उघड करावा, अशी मागणी वारंवार सोशल मीडियावर नेटिझन्स करीत असतात. एका व्यक्तीने याबाबत थेट माहिती अधिकारांतर्गत सीबीआयकडे अर्ज केला होता. सीबीआयने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. सीबीआयने केलेला खुलासाही चक्रावून सोडणारा आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्णच झाला नसल्याची एकप्रकारे कबुली दिली आहे. सीबीआयने म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणी तपास सुरु आहे. याबाबत माहिती जाहीर केल्यास तपासात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ही माहिती देता येऊ शकणार नाही.
सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते.
सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला होता. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला होता. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला आहे. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली होती. यामुळे सुशांतची हत्या झाली नसून, त्याने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सीबीआयने या प्रकरणी खुलासा करीत तपास सुरू असल्याचे म्हटले होते. सीबीआयने म्हटले होते की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही.
सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.