पुणे : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर कितीही आरोप केले. तुम्ही त्यांना धमक्या दिल्या, त्यांना अपमानीत केलं, त्यांच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्यांच्या बहिणीवर आरोप केले, आई-वडीलांना बदनाम केलं, त्यांची जात धर्म काढला....तरीही ते डगमगणार नाहीत. कर्तव्य बजावत राहीले... ‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला,’ या शब्दात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वानखेडे यांचे समर्थन केले आहे.
वाघ यांनी यांनी ट्विट करून वानखेडे यांच्यावर सरू असलेल्या आरोपांचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांच्यावर आरोप करीत आहेत. या आरोपांमुळे वानखेडे अडचणीत आले असून भाजपाकडून त्यांचे समर्थन करण्यात येत आहे.
दरम्यान, समीर वानखेडे हा अधिकारी अनुसुचित जाती-जमातीचा नसून तो मुस्लिम आहे, वानखेडे यांनी फसवणुकीने आरक्षित कोट्यातून नोकरी मिळवली असे धादांत खोटे आरोप करणाऱ्या नबाब मलिक यांच्या महाविकास आघाडीने शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार गमावल्याची टीका भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी आज येथे केली.
वानखेडे यांच्या समर्थनार्थ तसेच मलिक यांचा निषेध करण्यासाठी आज भातखळकर यांच्यातर्फे कांदिवली रेल्वेस्थानकाजवळ नागरिकांच्या सह्यांची मोहीम चालविण्यात आली. अमली पदार्थांना विरोध करा व समीर वानखेडे यांना पाठिंबा द्या, अशा आशयाची ही मोहीम होती. तिला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. याप्रसंगी लोकांना संबोधित करताना भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
एरवी अनुसुचित जाती जमातींच्या कल्याणाच्या बाता मारणारे महाविकास आघाडी सरकारचे नेते आपल्या शेपटीवर पाय पडला की अनुसुचित जातीच्या प्रामाणिक अधिकाऱ्याला आयुष्यातून उठवायला निघतात हे या प्रकरणातून सिद्ध झाले आहे. अमली पदार्थ प्रकरणी मलिक यांच्या जावयाला अटक झाल्याने चिडलेल्या मलिक यांनी वानखेडे यांच्यावर तद्दन खोटे आरोप करण्यास सुरुवात केली आहे.
मलिक यांना शिवसेनेचाही पाठिंबा आहे, म्हणजेच या पक्षांचे अनुसुचित जाती जमातींबद्दलचे प्रेम हे प्रत्यक्षात पूतनामावशीचे आहे हेच मलिक यांच्या कृतीतून दिसून येते. आपल्या स्वार्थासाठी अनुसुचित जाती जमातीच्या प्रामाणिक अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कोणत्याही थराला जाईल, याची जाणीव राज्यातील नागरिकांनी ठेवावी, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.