

Mumbai, 25 April : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी नागपूरमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत केलेल्या विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे. त्याचा खरपूस समाचार काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी घेतला आहे. भोंदूबाबांचे पीक हे भाजपनेच देशात आणले आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास बदलण्याचा भाजपचा कट असून बागेश्वर बाबा तीच भाषा बोलत आहेत, असा आरोपही सावंतांनी केला.
नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाद्ग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध करून थकले होते, त्या वेळी त्यांनी रामदास स्वामींकडे जाऊन तुम्हीच राजपाट सांभाळा, अशी विनंती केली होती, असा दावा बागेश्वर यांनी केला होता. त्यावरून राज्यात जोरदार वाद-प्रतिवाद रंगला आहे.
काँग्रेसचे माजी प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी बागेश्वर बाबांवर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, भोंदू धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा संघाच्या व्यासपीठावर येतो आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? हे सांगतो! या लोकांना वर्तमान माहीत नाही, ते इतिहास सांगणार. शिवरायांनी थकून राजपाठ रामदास स्वामींकडे दिला, असे धांदात खोटे आणि संघाच्या व्यासपीठावर बोलले जाते. हा महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मूळात रामदास स्वामी आणि महाराजांची भेटच झाली का? यावर प्रश्नचिन्ह आहे.
मनुवादी भाजपचा छत्रपती शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट आहे आणि तीच भाषा हा बागेश्वर बाबा करत आहे. आणि याला मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, मोहन भागवत थांबवत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या बागेश्वर बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
या बागेश्वर बाबाने अजून गुण उधळले, तो म्हणाला ‘चार मुले जन्माला घालून एक संघाला द्या, मग इतर तीन मुलांचे संगोपन, शिक्षण कसे करायचे? हे पण सांगा. बरं हे सांगणारा आणि ज्यांच्या व्यासपीठावर हे सांगतोय ते सर्व ब्रम्हचारी! जी गोष्ट करायची ती स्वतः पासून आधी अंमलात आणा, असा सल्लाही सावंतांनी बागेश्वर आणि संघ परिवारातील नेत्यांना दिला आहे.
सावंत म्हणाले, महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आणि अशा लोकांना मान्यता दिल्याबद्दल आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वतः महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, ही आमची मागणी आहे.भाजप आणि संघाचे राजकारण पुढे नेण्यासाठी देशात भोंदू बाबांचे पीक भाजपने आणले आहे. मोदी सरकार देशात आणण्यासाठी काही बाबांचीच मदत घेण्यात आली होती. काळा पैसा येणार, पेट्रोल ₹३५ मध्ये मिळेल इत्यादी भाजपच्या वल्गनांवर जनतेचा विश्वास बसावा, यासाठी या बाबांचे योगदान होते.
नंतरच्या काळात प्रवचने, कथा, कीर्तने यांच्या नावाखाली समाजात द्वेष पसरविण्याचे पर्यायाने भाजपचा प्रचार करण्याचे काम काही बाबा, बुवांना देण्यात आले आहे. काही बाबांना राजमान्यता देऊन त्यांचे प्रस्थ वाढवण्यासाठी मदत केली जाते. भोंदू खरातबरोबर महायुतीच्या नेत्यांची उठबस या त्या परिप्रेक्षात पाहिली पाहिजे. बागेश्वर बाबांची लोकांचे भविष्य सांगण्याची पध्दत काही वेगळी नाही. ही सर्व बाबा बुवा मंडळी मायेच्या आधीन आहेत. यांना ईश्वर कसा प्राप्त होईल? असा सवालही काँग्रेस नेत्याने केला.
जीवनभर भक्ती करुन ‘भेटी लागली जीवा, लागली ही आस , नको देवराया अंत आता पाहू’ असे म्हणणारे आपले खरे संत आणि थेट हनुमानाशी संपर्क साधतो असे म्हणणारे हे रॉंग नंबर यातील फरक जनतेने जाणावा. आणि आता हे बाबा येऊन छत्रपतींचा इतिहास बदलू पाहत आहेत, यांना वेळीच रोखले पाहिजे!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.