मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह विविध पक्षांतील नेते व मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली. पण यावेळी काँग्रेसचा (Congress) एकही बाड नेता दिसला नाही. त्यावरून आता सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनीच यावेळी हजेरी लावली होती. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे कोरोना बाधित असल्याने लतादिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासूचेही निधन झाल्याने मी तिकडे होतो. लतादिदींच्या अंत्यसंस्कारावेळी भाई जगताप तिथे होते.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वर्षा गायकवाड मुंबईबाहेर होत्या. शनिवार, रविवार मुळे अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाही. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्या आहेत. कालच सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या. त्यांचे योगदान एवढे मोठे आहे. आता थोड्या वेळात मी लतादिदींच्या परिवाराचे सांत्वन करायला जाणार आहे, असंही पटोले यांनी सांगितले.
शिवाजी पार्कवरच स्मारक व्हावं...
लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवरच (Shivaji Park) व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नाना पटोले यांनी त्याचे समर्थन केले आहे. हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं. देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर त्यांचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील, अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावे ही आमची भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.
पेडर रोडच्या पुलाचे राजकारण
लतादीदी यांनी मुंबईतील पेडर रोडच्या उड्डाणपुलाला विरोध केला होता. त्यावर पटोले म्हणाले, जेव्हा हा विषय आला होता तेव्हा त्यांनी मला डिस्टर्ब होईल म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी आघाडीचे सरकार होते. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि उड्डाणपूल पेडर रोडला झाला नाही, असेही पटोले यांनी नमूद केलं.
शाहरुख खानला पाठिंबा
लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्या कृतीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले, प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचे संविधानाप्रमाणे स्वातंत्र्य आहे. काहीजण जाणीवपूर्वक धर्मावर टीका करून मोठे करण्याचे काम करत आहेत. काही जणांनी दुसऱ्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.