ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपत असल्याचे नड्डांचे विधान... : फडणवीसांचे स्पष्टीकरण

Devendra Fadnavis | BJP | Shivsena : महाराष्ट्रातही शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. तिथेही आता केवळ कमळ फुलणार आहे.
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Latest News
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray Latest News Sarkarnama

मुंबई : देशातील कोणत्याही पक्षात भाजपशी लढण्याची क्षमता राहिली नाही. आता देशात बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील आणि फक्त भाजप शिल्लक राहील. महाराष्ट्रातही शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. तिथेही आता केवळ कमळ फुलणार आहे, असे मोठे विधान भाजपचे (BJP) अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी केले होते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु झाला असून या वादावर आता भाजपचे राज्यातील नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे. पी. नड्डा यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना होती ती संपत चालली आहे असं म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नवीन आहे. या नवीन शिवसेनेबाबत नड्डा यांनी असं वक्तव्य केलेलं नाही. कृपया लोकांच्या मनात याबाबत संभ्रम तयार करू नका, असेही आवाहन फडणवीस यांनी केले.

जे.पी. नड्डा यांच्या याच वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला :

आजच्या राजकारणात बुद्धिचा नाही तर बळाचा वापर केला जात आहे. नुसते बळ तुमच्याकडे आहे. पण लक्षात ठेवा काळ बदलत असतो. तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असला तर दिवस सर्वदा सारखे नसतात. दिवस फिरतात, दिवस फिरले तर काय याचा विचार जे. पी. नड्डा आणि भाजपने करावा असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, सत्तेचा फेस अंगावर आहे, तोपर्यंत ते आमच्यावर टीका करु शकतात. एकदा फेस उतरला की सत्य परिस्थिती समजेल. फेस उतरला तर ते काय आहेत हेही लोकांसमोर येईल. केवळ सोबत येतील ते आपले, अशी पूर्वीची निती असायची. पण आता केवळ सोबत येतील ते नाही तर जे गुलाम होतील ते काही काळ आपले ही निती अवलंबण्यात येत आहे. काम संपल्यावर नवीन गुलाम येतील, हे गुलाम जातील. एकूण काय तर गुलामगिरीकडे वाटचाल सुरु आहे. त्याचा निषेध केला पाहिजे.

प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात कोश्यारींच्या उद्गारातून झाली आहे :

उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात कोश्यारींच्या उद्गारातून झाली आहे. इथे मी राज्यपाल हा शब्द मुद्दाम वापरत नाही. आज नड्डा म्हणाले पक्ष संपतील, म्हणजे काय तर प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची. हिंदूत फूट पाडायची आणि स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची, हे भाजपच आजचं राजकारण आहे.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीवर तुमचं ऐक्य अवलंबून नसतं :

देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रादेशिक पक्षांची एकजूट महत्वाची आहे. देशाला अनुशासन पाहिजे होते त्यासाठी शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. तेव्हा जेव्हा राजकारणाशी संबंध नव्हता. पु.ल. देशपांडे दुर्गा भागवत अशा साहित्यिक विचारवंत यांनी लोकशाहीच्या होमकुंडात उडी मारली होती. लोकशाही जिवंत ठेवली होती. आता वेळ गेलेली नाही, त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जनतेनेही एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com