मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी सभागृहात महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते. साखर कारखान्यांच्या विक्रीतही भ्रष्टाचार झाल्याचा घणाघात दरेकर यांच्यासह भाजपच्या (BJP) अन्य नेत्यांकडून केला जातो. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरूवारी विधान परिषदेत प्रत्युतर दिलं. यावेळी त्यांनी दरेकरांना जोरदार टोला लगावला.
दरेकरांच्या भाषणावरून बोलताना पवार म्हणाले, दरेकरसाहेबांनी खूप मोठं भाषण केलं. त्यांनी आरोपही खूप केले. मी त्यावेळी सभागृहात नव्हतो. पण त्यादिवशी ते फारच तापलेले, पेटलेले वाटले. त्यांना एवढं तापलेलं, पेटलेलं कधी बघितलं नव्हतं. मी या सभागृहात गडकरीसाहेब, विनोद तावडेंचंही कामकाज पाहिलं. पण तुमचा एकंदर रागरंग बघून दरेकरसाहब को गुस्सा क्यों आता है? अशा पध्दतीनं मला वाटायला लागलं, असा टोला पवार यांनी लगावला.
अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. दरेकर यांच्या दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या गुन्ह्याचा उल्लेख न करता पवारांनी दरेकरांचा असा रागरंग असण्यामागंच कारण सांगितलं. ते म्हणाले, 'त्यालाही काही कारणं असू शकतात. ती तुम्हालाच माहिती आहे.' पवार यांनी त्यानंतर जरंडेश्वर कारखाऩ्यासह इतर कारखान्यांची विक्री आणि सद्यस्थितीबाबतही सभागृहात निवदेन सादर केलं. (Ajit Pawar on Pravin Darekar News)
मधल्या काळात जे वातावरण केलं गेलं की, काही साखर कारखाने विकले गेले, त्यातून भ्रष्टाचार झाला, दरोडे घातले, लुटालुट झाली. मुद्दाम लुटालुट केली, असं तुम्ही म्हणाला. आम्हीही शेतकरी आहे, त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांच्या मुळावर कधी उठणार नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे. ईडीनंही जप्तीची कारवाई केली आहे. काही जण घोटाळ्यांचे आकडे असे काढतात की, आकडे बघून माणूस गळून जातो. आमच्यावर यायला लागलं की थोडंसं तुमच्यावरही येणारंच ना. मनुष्यस्वभाव आहे. यातील वस्तुस्थिती तुम्हालाही माहिती आहे, असं अजितदादा म्हणाले.
विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय नाही
जिल्हा वार्षिक योजनेसंदर्भात कोकण, विदर्भ, मराठवाड्या कमी निधी दिला, असा आरोप दरेकर यांनी केला होता. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, विदर्भाला 26 टक्के, मराठवाडा पावणे एकोणीस टक्के आणि उर्वरित महाराष्ट्राला 55 टक्के निधी दिला आहे. उलट उर्वरित महाराष्ट्राला तीन टक्के कमी निधी गेला आहे. विदर्भाला तीन टक्के निधी जास्त दिला. त्यामुळे कुणावरही अन्याय झालेला नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.