CM Eknath Shinde News : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर राजकारण तापलेलं असतानाच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहेत. ठाकरे यांनी आपले मंत्री बेळगावला जाणार असं समजलं होतं. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर त्यांचा दौरा रद्द झाला. एवढा नेभळट महाराष्ट्र कधी पाहिला नव्हता. हे नेभळट सरकार म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत आहेत तसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आवंढा गिळून तरी काही तरी बोलणार का? अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंवर खरमरीत टीका केली होती. याच टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले,बेळगावविषयी काही लोक मतप्रदर्शन करत आहेत. त्यांना माझं एवढंच सांगायचं आहे की, आक्रमकपणा कसा दाखवायचा हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. मी बेळगावच्या प्रश्नावर ४० दिवस तुरुंगवास भोगला होता. बेळगांवमध्येच नव्हे तर, देशाच्या कुठल्याही भागांमध्ये जायला कोणीही कोणाला रोखू शकत नाही अशा शब्दांत शिंदेंनी बोम्मई यांना खडसावलं.
यावेळी राज्यातील दोन मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यासंदर्भात कर्नाटक सरकारने खरंतर सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती. परंतू मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. मात्र, हे मंत्री सीमाभागांतील मराठी बांधवांची भेट घेणार असून राज्य सरकार मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असेही ठाम मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.
महाविकास आघाडीने आता राज्यपालांविरोधातील टीकेची धार आणखी तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार , माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेत्यांच्या उपस्थितीत आघाडीची बैठक झाली.यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत 17 डिसेंबरला विराट मोर्चाची घोषणा देखील करण्यात आली आहे. यावेळी ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर आगपाखड केली होती.
महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाच्या घोषणेवर या सर्व पक्षांना विराट मोर्चासाठी शुभेच्छा म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.
उध्दव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
गुजरातच्या निवडणुकी अगोदर यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. त्याचप्रमाणे येत्या काही महिन्यांमध्ये कर्नाटकाच्या निवडणुका येत असून त्या जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील गावंही खरोखर तोडणार आहेत का? महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत हे कधी कळणार? आपले मंत्री बेळगावला जाणार असं समजलं होतं, मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर त्यांचा दौरा रद्द झाला. एवढा नेभळट महाराष्ट्र कधी पाहिला नव्हता. हे नेभळट सरकार म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे सांगण्याची आता वेळ आली आहे असेही ठाकरेंनी सुनावलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.