Thane Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील भाजप आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांसाठी सभा, रोड शो, रॅली घेत आहेत. आता पाचव्या टप्प्यातील रणधुमाळी सुरू असून राज्यात मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, बुधवारी (ता. 15) पंतप्रधान मोदींची कल्याणमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी मात्र मुख्यंमंत्री एकनाथ शिंदेंच्या भरवशावर खासदारकीचे स्वप्न पाहणारे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा रात्रीतच 'गेम' झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदींची भाजपचे भिवंडीचे उमेदवार कपील पाटील, शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे श्रीकांत शिंदे Shrikant Shinde आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा बुधवारी धडक्यात झाली. तत्पुर्वी सभेची तयारी करताना लावलेल्या बॅनरवर या तिनही उमेदवारांचे फोटो दिमाखात होते. महायुतीच्या या उमेदवारांच्या फोटोचे बॅनर मंगळवारी व्यासपीठावर लावले होते. त्यानंतर सभेच्या दिवशी बुधवारी मात्र व्यासपीठावरील बॅनरवर फक्त कपील पाटील आणि श्रीकांत शिंदे यांचेच फोटो दिसले. ठाण्याचे उमेदवार आणि मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार म्हस्के यांचा फोटो रातोरात गायब झाला होता. या रात्रीस झालेल्या खेळाची चर्चा मात्र ठाण्यासह सर्वत्र सुरू झाली आहे.
ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचा बालेकिल्ला समजला जातो. या जिल्ह्यात लोकसभेचे तीन मतदारसंघ येतात. त्यातील ठाणे लोकसभेचा 'ठाणेदार' होणारी जागा शिंदे सेना आणि भाजपच्या वतीने प्रतिष्ठेची केली होती. अखेर ती जागा शिंदे यांनी खेचून आणली. तसेच शिंदेंनी आपले निकटवर्तीय नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपमधील नाराजी उफाळून आली. नाराजी थोपविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ठाण्यात प्रचाराला उतरावे लागले. असे असतानाही नाराजीचा सूर कमी होताना दिसत नाही. परिणामी मुख्यमंत्री शिंदे यांनीच ठाण्याच्या प्रचारात जातीने लक्ष घातले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी Narendra Modi कल्याणमध्ये १५ मे रोजी सभा घेणार होते. त्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली. सभास्थळी उभारलेल्या व्यासपीठावर ठाणे जिल्ह्यातील तिन्ही महायुतीचे उमेदवारांचे फोटो असलेला बॅनरही लावण्यात आला. त्यामध्ये डावीकडून कपिल पाटील, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या क्रमाने ते फोटो होते. त्यानंतर प्रत्यक्षात सभेच्या दिवशी मात्र या बॅनरवरून म्हस्केंचा फोटो गायब होता. या प्रकारामुळे ही सभा फक्त दोन उमेदवारांसाठी होती का ? म्हस्के हे महायुतीचे उमेदवार नाही का ? भाजपने आपली नाराजी म्हस्केंचा Naresh Mhaske फोटो गायब करून जाहीर केली का? किंवा आणखी काही कारणाने तो बॅनर बदलण्यात आला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यावर अद्याप काही माहिती समोर आली नसली तरी चर्चांना मात्र उधाण आले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.