
Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता पंधरा दिवसांहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीदेखील हा पराभव महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) पचवता आलेला नाही. त्यांना महायुतीचा महाविजय आणि आपल्या उमेदवारांचा पराभव संशयास्पद वाटतो आहे. या सगळ्या घडामोडींनंतर आता निवडणूक आयोगानं एक महत्त्वपूर्ण पत्रक जारी केलं आहे. यामुळे विरोधकांच्या आरोपातली हवाच निघण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे ईव्हीएमविरोधात (EVM) मोठं आंदोलन छेडण्याची तयारी आणि राज्यात राजकीय वातावरण पेटवण्याचं काम विधानसभेत सपाटून मार खाललेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला महाविकास आघाडीकडून बळ देण्याचं काम सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारकडवाडीला भेट देऊन हे आंदोलनाला हवा देण्याचं काम केलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनीही मारकडवाडीत जाऊन ईव्हीएमच्या समर्थनार्थ मोठी जाहीर सभा घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
विरोधकांच्या ईव्हीएमसह अनेक आरोपांवर निवडणूक आयोगाकडून तत्काळ खुलासा देण्यात आहे. तरीपण या उत्तरांनी समाधान न झाल्यानं विरोधकांनी आपलं आंदोलन सुरुच ठेवलं आहे. पण आता या वादावर निवडणूक आयोगाने एक पत्रक काढलं आहे.
या वादावर आता निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा खुलासा केला आहे. याचवेळी VVPAT मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत आढळून आले नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे, ईव्हीएमच्या आरोपात कसलेली तथ्य नसल्याचं आयोगाने विरोधकांना दाखवून दिलं आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघ/विधानसभा विभागातून 5 मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती. आयोगाने निवडलेल्या या 5 मतदान केंद्रांच्या VVPAT स्लिपची मोजणी करणे अनिवार्य होते. त्यानुसार, येथील VVPAT मशिनची मोजणी करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार,मतमोजणीच्या संदर्भात प्रत्येक मतदारसंघाच्या 5 मतदान केंद्रासाठीची व्हीव्हीपॅट स्लीमची गणना अनिवार्य असून, ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही. तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाही.राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे,असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
तसेच 23 नोव्हेंबर रोजीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या 5 मतदान केंद्रांची VVPAT स्लिप मोजणी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी निरीक्षक/उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील 1440 VVPAT युनिट्सची स्लिप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली गेली आहे.
संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच DEOs कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार VVPAT स्लिपचा काउंट आणि EVM कंट्रोल युनिट काउंटमधील आकडेवारी समसमान आहे.त्यामध्ये,कोणतीही तफावत आढळलेली नाही. त्यामुळे,मतमोजणीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून या पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.